शाळेच्या पीलरला तडा; जीव मुठीत घेऊन विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे
संचालकांचे लक्ष वेधूनही दुरुस्ती करण्यात निष्काळजीपणा
कल्याण (प्रविण आंब्रे): राज्यात शाळेच्या इमारती कोसळण्याच्या काही घटना घडलेल्या असताना कल्याण येथील एका खाजगी शाळेच्या इमारतीच्या पिलरला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. धोकादायक सदृश्य स्थितीतील सदर शाळा इमारत दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याची मागणी एका जागरूक तरुणाने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांच्या इमारतींचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडीट होत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
कल्याण पश्चिमेतील जोशीबाग प्रभागात मातुश्री जमनाबाई भगवानदास कन्या विद्यालय ही मुलींची शाळा असून संस्थेची स्वत:ची इमारत आहे. सदर इमारतीला ५० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. आजूबाजूचा परिसर निवासी भाग आहे. या शाळेत पहिली ते १० वी पर्यंतचे वर्ग भरतात. सुमारे १२०० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. तसेच सुमारे २० ते ३० जणांचा कर्मचारीवर्ग आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी शाळेच्या इमारतीच्या मागील एका पीलरचा थोडासा भाग आणि खिडकीच्या सज्जाचा काही भाग खाली कोसळला. इमारतीच्या बाजूने येण्या-जाण्याचा मार्ग असून तेथे लहान मुलेही खेळत असतात. सदर दुर्घटना घडली तेव्हा खाली असलेली एक वृद्धा आणि तीन वर्षीय मुलगा त्यातून थोडक्यात बचावले. ही घटना पाहणाऱ्या तेथील रहिवाशी असलेल्या राहुल अग्रवाल नामक तरुणाने शाळेच्या संस्थेच्या सेक्रेटरी जयेश कारीया यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी कारीया यांनी शाळेत येऊन इमारत पहिली आणि इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेऊन दुरुस्ती करून घेण्याचे मान्य केले. या घटनेला २३ दिवस उलटूनही शाळेकडून कोणतीही कारवाई न झाल्याने शाळेचे विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांच्या जीविताला उत्पन्न होणारा संभाव्य धोका लक्षात घेत राहुल याने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त, महापौर आणि अन्य संबंधितांना अतितातडीचे लेखी निवेदन देऊन त्यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधत सबंधित शिक्षण संस्थेवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शाळांच्या इमारतींचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याचे शासनाचे सक्त आदेश असतानाही सदर घटना कशी घडली, असा सवाल जागरूक नागरिक करीत आहेत. सुदैवाने गंभीर दुर्घटना टळली असली तरी संभाव्य धोका लक्षात घेता सदरहू शाळा संचालकांनी इमारतीची तातडीने दुरुस्ती करून घेण्यात निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप करण्यात येत आहे. मध्यंतरी दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने शाळा इमारतीची दुरुस्ती करून घेणे शिक्षण संस्थेला सोयीचे ठरले असते, असे मत परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे व मुंबई-ठाणे परिसरात धोकादायक इमारत कोसळण्याच्या घटना घडल्याने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेषत: शाळांच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट वेळेवर करण्याबाबत शासनाचे सक्त आदेश असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात प्रभाग क्षेत्र अधिकारी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याचे सांगत शाळेच्या मुख्याध्यापकांना स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली असून त्यानुसार प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती दिली. सदर इमारत ६०-७० वर्ष जुनी असून नियमानुसार अशा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेणे आवश्यक असल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. शाळा संस्थेचे सेक्रेटरी कारीया यांना मोबाईल फोनवर संपर्क साधून प्रतिक्रिया घेतली असता म्हणाले की या घटनेचे आम्हालाही गांभीर्य असून उद्यापासून आम्ही युद्धपातळीवर इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु करत आहोत.