मुंबई, ता. २५ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सातत्याने शरद पवारांकडून संभ्रमित करणारी भूमिका मांडली जात आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. परंतु, दोन किंवा तीन दगडांवर पाय ठेवून कोणी राजकारण करणार असेल तर जनता निर्णय घेईल, असा टोला शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना लगावला. तसेच पवारांची विचारधारा पाहता, ते भाजपसोबत कदापि जाणार नाहीत, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.  

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय आणि अजित पवारांबद्दलच्या भूमिकेबद्दल जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे. नुकतेच पक्षात कोणतीही फूट नाही. अजित पवार पक्षाचे नेते आहेत, अशी कबुली दिल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले. परंतु, साताऱ्यात शरद पवारांनी आधीचे वक्तव्य फेटाळून लावत, आपली भूमिका बदलली. पहाटेच्या शपथविधीनंतर ठरले असताना, त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आता अजित पवारांना पुन्हा संधी नाही, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शरद पवारांच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली.

शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची सध्याची वक्तव्य संभ्रमित करणारी असल्याने शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शरद पवार यांनी त्यावर उत्तर द्यायला हवे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आणि इंडिया आघाडीतील ते प्रमुख घटक आहेत. सध्या राज्यात वैचारिक लढा सुरू आहे. भाजपाबरोबर गेलेल्या, हुकूमशाही प्रवृत्तीबरोबर हातमिळवणी करणाऱ्या, अशा कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला महाविकास आघाडीत स्थान नाही. ईडीला घाबरून ज्यांना जायचे आहे ते जाऊ शकतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शरद पवार यांच्या शब्दांत सागांयचे झाले तर, ही लोकशाही आहे, त्यामुळे तो निर्णय त्यांचा असेल. परंतु, महाविकास आघाडीचे काही निर्णय आहेत. दोन दगडांवर किंवा तीन दगडांवर पाय असे कोणाचे राजकारण असेल तर त्यासंदर्भात जनता निर्णय घेईल, असा अप्रत्यक्ष टोला राऊत यांनी पवारांना लगावला.

शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारा गट हा महाविकास आघाडी सोबत आहे. शरद पवार यांची वैचारिक भूमिका भाजप विरोधी आहे. यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानणारे पवार कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट आहे, याबाबत जनतेच्या मनात कोणताही संभ्रम नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर तात्काळ हकालपट्टी केली. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस मधून एक गट फूटल्यानंतर पक्षाने अजित पवार यांच्यासह अनेकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. याला फूट नाही, तर काय म्हणायचे? ही फूट आहे, असल्याचा दावा राऊतांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!