मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच काही मोठ्या गुन्हेगारांना आगामी निवडणुकांच्या आधी बाहेर काढण्याचं षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचंही त्यांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालय तुरुंगात असलेल्या अनेक मोठ्या गुन्हेगारांच्या संपर्कात आहे. या मुंबईपासून नाशिक, कोल्हापूरपर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांशी संपर्क साधला जात आहे. तुरुंगात कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवण्यात आले असून त्यावरून संपर्क साधला जात आहे. हे सगळं मुख्यमंत्री कार्यालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. लवकरच याबाबतची माहिती मी लोकांसमोर घेऊन येईन. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. परंतु ते त्यांचं फ्रस्ट्रेशन (निराशा) महाराष्ट्रावर काढत आहेत. यामुळे केवळ राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यातलं सरकार दाऊद इब्राहिमच्या टोळीसारखं काम करत आहे असेही राऊत म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारावरूनही त्यांनी महायुतीवर टीका केली. महायुती म्हणजे एक टोळी आहे. हे लोक मंत्रिपदासाठी आपआपसात लढत आहेत. उद्या मंत्रिपदासाठी एकमेंकांच्या अंगावर हात टाकतील. अजित पवार आल्यावर त्यांचं अस्तित्व संपलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.