मुंबई : मुंबईतील रेडीओबारमध्ये भाजपच्या नेत्याने दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले भाजप नेते हे मोहित कंबोज (Mohit Kamboj) असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. जे त्यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी राऊत यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत म्हणाले की, मुंबईत रेस्टॉरंट आणि बार साधारण 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना रेडिओ बार पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरू होता. आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रॅफिक जॅम झाले, म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली होत्या आणि त्यांच्या गराड्यात भाजप नेते मोहित कम्बोज मद्यधुंद अवस्थेमध्ये होते. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले. मोहित कम्बोज वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्च पद्धतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या. हिंमत असेल तर मला इथून बाहेर काढून दाखवा, मी आता देवेंद्रला फोन करतो बघा. असं तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला. पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले. पोलिसांसमोर कम्बोज त्याही अवस्थेत दारू पित होते.