मुंबई, दि. १७ः शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना, संविधान आणि कायदे पायदळी तुडवले. तसेच विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पत्रकार परिषद घेऊन तुणतुणे वाजवले. वकिल असलेल्या विधानसभा अध्यक्षांची आता पदवी तपासावी लागेल, असा हल्लाबोल शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी टीकेची झोड उठवली.

शिवसेनेने (ठाकरे) महापत्रकार परिषद घेऊन पक्षाची घटना, कार्यकारणीच्या निवडणुकीची चित्रफिती दाखवून अध्यक्षांच्या निकालाची पोलखोल केली. अध्यक्ष नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी यावरून नार्वेकरांवर जोरदार टीकास्त्र सोडले. एकदा पक्षाची घटना निवडणूक आयोगाला दिल्यानंतर दरवर्षांनी घटना दिली जात नाही. केवळ केले जाणारे बदल कळवले जातात. नार्वेकर वकील आहेत. आमदारांचा निकाल देताना त्यांनी कायदे, संविधानाची अभ्यास करण्याऐवजी पायमल्ली केली. लवादाची भूमिका बजावणे अपेक्षित असताना, राजकीय वळण दिले. हा प्रकार हास्यास्पद आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तसेच शिवसेनेने (ठाकरे) नार्वेकर खोटारडे असल्याचे अनेक भक्कम पुरावे मांडले. परंतु, नार्वेकर यांनी राजकीय पत्रकार परिषद घेऊन तरीही जुने तुणतुणे वाजवले. नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वकील आहेत. एकदा दोघांनी एकत्र बसून काय ते ठरवावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी

लोकसभेच्या मुंबईतल्या दोन जागा शिंदे गट लढवेल ती पण कमळाच्या चिन्हावर लढवणार आहे, असे ऐकले आहे. मुंबईतील भांडवलदार आणि गुजरातचे उद्योजक ठरवतील, त्या जागा शिंदे गटाला लढवाव्या लागतील. शिंदेंची शिवसेना ही शिवसेना नसून ओढून ताणून केलेला सगळा प्रकार आहे. ते एक पाकिटमारी आहेत. दुसऱ्याचे पाकिट मारायचे आणि आपल्या खिशात ठेवायचे हे फार काळ टिकणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. आमची खरी शिवसेना असून आम्ही २३ जागा लढणार असल्याचा दावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *