मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आजच्या विधीमंडळात उमटले. राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याची मगाणी करीत यावरून सत्ताधारी आक्रमक झाले होते. सत्ताधारी-विरोधकांच्या चर्चेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ८ मार्चला राऊतांच्या हक्कभंगावर निर्णय घेऊ, असं सूचित केलं. दरम्यान सत्ताधा-यांच्या गोंधळानंतर विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. राऊतांच्या या वक्तव्यावरून आज सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. भाजपच्या आमदारांनी राऊतांवर आगपाखड केली. राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आमदार नितेश राणे यांनीही राऊतांवर जोरदार टीका केली. ‘१० मिनिटं सुरक्षा हटवा..संजय राऊत उद्या दिसणार नाही’ असे विधानही त्यांनी केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांच्या वक्तव्यावर भूमिका मांडत त्यांचं विधान चुकीचंच असल्याचं म्हटलंय. “कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने कोणालाही चोर म्हणण्याचा अधिकार नाही. पक्षाची भूमिका बाजूला ठेवून सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. जर कोणी असं बोलले असेल तर विधीमंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा,” असं अजित पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेष हक्कभंग सूचना दिली आहे. संजय राऊत यांचं विधीमंडळ हे चोरमंडळ विधान ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही बाब लोकप्रतिनिधी अपमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
…तर उध्दव ठाकरेही चोर मंडळाचे सदस्य ठरतील : फडणवीसांचा निशाणा
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या विधानाचा निषेध केला. फडणवीस म्हणाले की, “विधिमंडळाला चोर म्हणणं हे सहन करण्यासारखं नाही. या विधानमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक मोठे नेते या सभागृहाने बघितले आहेत. आपल्या राज्याचं विधानमंडळ हे देशातील सर्वोत्कृष्ट असं विधानमंडळ आहे. या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाला दिला, तर जनतेचा या सभागृहावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे राऊतांच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधिमंडळ म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा सभागृहाचे सदस्य आहे. मग तेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात. आम्ही सर्वचचोर मंडळाचे सदस्य ठरतो. राऊतांनी केवळ चोरमंडळ नाही, तर गुंडमंडळ असा शब्दही वापरला आहे. आम्ही काय गुंड आहोत का?” असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला.
राऊतांची सारवासारव ..
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर हक्कभंग प्रस्ताव दाखल झाल्यानंतर राऊत यांनी सारवासारव केली, राऊत म्हणाले की, “चाळीस चोरांनी आमच्या विधिमंडळाचं चोर मंडळ केले असे मी म्हणालो. पण लगेच सभागृहात गोंधळ सुरु झाला. आम्हाला विधानसभेविषयी लोकसभेविषयी आदरच आहे. पण एका चिन्हावर निवडून यायचं, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून यायचं उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी रक्त आटवायचं आणि निवडून आले की पळून जायचं. या चोर मंडळाला आपल्याला कायमचा धडा शिकवायचा आहे,” असं ते यावेळी म्हणाले.