मुंबई, दि. ३०ः खिचडी घोटाळ्याचा शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांवर ठपका ठेवत, ईडीकडून कारवाई सुरू आहे. युवासेनेचे सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्याच अनुषंगाने ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.  किरीट सोमय्यांनी पाच महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.  


खिचडी घोटाळ्यात विरोधकांना ओढले जात आहे. मात्र, सत्तेत सामील झालेल्या खऱ्या खिचडी घोटाळ्यातील लाभार्थ्यांवर कारवाई होत नाही, असा हल्लाबोल शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला. दरम्यान, इतरांच्या घरादारावर कारवाईसाठी पुढाकार घेणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी पाच महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला.

 संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. दोन पाच लाख रुपयांसाठी ईडीकडून आमच्या नेत्यांना वेठीस धरले जात आहे. ईडीची पातळी एवढी घसरली का, असा सवाल राऊत यांनी विचारला. कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणारे अमेय घोळे, वैभव थोरात, राहुल कनाल सत्तेत सामील झाले. शिवसेनेचा (ठाकरे) खासदार खिचडी घोटाळ्याचा म्होरक्या असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तो सत्तेत आल्यावर ईडी आणि सोमय्या त्यानंतर गप्प बसले. कितीही वार करा, आम्ही झेलायला तयार आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला.
 

सोमय्यांनी विक्रांत जहाज बचाव प्रकरणात कोट्यवधी रुपयांची माया जमवली. मविआ काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सोमय्या बाप- लेक त्यानंतर गायब झाले. भाजप सत्तेत आल्यानंतर गुन्हा रद्द करून घेतला. दुसऱ्यांच्या घरादारावर कारवाईसाठी सोमय्या पुढे असतात. स्वतःवर आल्यावर कारवाईला का सामोरे गेले नाहीत, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करत आक्षेपार्ह टीका केली. सोमय्या विरोधात पाच महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. आम्ही संस्कारी आहोत. घरादारा पर्यंत जाणार नाही. मात्र, पटलवाराची संधी मिळाली तर सगळ्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचे राऊत यांनी ठणकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!