मुंबई, दि.२२ : भाजप एक गॅंग आहे. या गॅंगमध्ये अनेक टोळ्या सामील झाल्या आहेत. या टोळी युध्दावर मला भाष्य करायचे नाही. परंतु, अखंड शिवसेना असताना स्वाभिमाने भाजपसोबत २३ जागा लढवल्या. या निवडणुकीत देखील २३ जागांवर लढणार, आहे. अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार केला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. यावेळी जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्यावर एकमत झालेले आहे. त्यामुळे जागा वाटपात कोणतेही मतभेद होणार नाहीत, असे राऊत म्हणाले. जे. पी. नड्डी यांनी देशात भाजप ३७० जागा जिंकणार, असा दावा केला. राऊत यांनी या विधानांचा खरपूस समाचार घेतला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप लबाडी करत आहे. चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीतून हे सिध्द झाले आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी ३७० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. याचा अर्थ हा आकडा गाठण्यासाठी सर्व यंत्रणा आधीच ताब्यात घेतल्या आहेत. ही लोकशाहीची थट्टा आहे, असा आरोप राऊत यांनी केला. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन चिरडणारे केंद्र सरकार कायर आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंद्याप्रमाणे आता महानंदा दुध डेअरी सुध्दा गुजरातला नेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईचा सौदा करत असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.