मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमधील तिढा अद्याप सुटलेला नाही. ज्यामुळे या दोघांमधील कुरबुरी सातत्याने सामोरे येत आहेत. आता आंबेडकरांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना पत्र पाठवत काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांचे रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण आहे, असा टोला लगावला आहे.
आज प्रसार माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, प्रकाश आंबेडकरांनी एकट्या काँग्रेसला पत्र पाठवले आणि त्यांच्याकडे सात जागांची यादी मागितली आहे. त्या सात जागांवर पाठिंबा देणार वगैरे… मग उरलेल्या जागांवर त्यांचा म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा करून ते काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहेत का? प्रकाश आंबेडकर असे गुंते निर्माण करतात, वेगवेगळी कोडी टाकतात. हे प्रकाश आंबेडकरांचे रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण आहे.
आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला आहे आणि यापुढेही करू. आमच्यात हुकूमशाहीविरोधात लढण्याची एकवाक्यता आहे. आम्ही संविधान रक्षणासाठी एकत्र यायचे ठरवले आहे. देशात संविधानाची रोज हत्या होत आहे. त्यामुळे मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. आम्ही वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, l शरद पवार, नाना पटोले आणि आम्ही इतर काहीजण बसून यावर चर्चा करणार आहोत. त्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. कुठलाही प्रस्ताव कधीच अंतिम नसतो. त्यावर चर्चा होत असतात, असेही संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.