मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.“पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा, हीच मोदी गॅरंटी”, अशी टीका करीत, निवडणुक आयोग हा भारताचा आयोग नाही तर मोदी-शहांचा आयोग झाल्याचा टोला प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, जे शिवसेनेच्याबाबत घडले, तेच शरद पवार यांच्यासोबतही घडले. पक्षाचे संस्थापक सुनावणीवेळी निवडणूक आयोगाच्या समोर बसलेले असतानाही आयोगाने संपूर्ण पक्ष दुसऱ्यांच्या हातात सोपवणे, याला मोदी गॅरंटी म्हणतात. भ्रष्टाचार करा, त्यानंतर आम्ही तुमच्या मागे ईडी, सीबीआय लावू आणि मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा, ज्यानंतर तुम्ही आमच्यासोबत आलात की आम्ही तुम्हाला पावन करू आणि ज्या पक्षावरती आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष आम्ही तुम्हाला देऊ. हीच मोदींची गॅरंटी असल्याचा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
भ्रष्टाचार आरोप केला तो पक्ष मोदी शहानी अजित पवारांना दिला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. अजित पवारांवर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. आज काळाने त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे. तोच पक्ष मोदी आणि शाह यांना अजित पवारांना दिला. निवडणूक आयोगाने हा पक्ष अजित पवारांना दिला. निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग नाही तर मोदी शाह यांचा निवडणूक आयोग आहे. मोदी आणि शाह यांना महाराष्ट्राचा बदला घ्यायचा आहे म्हणून हे सगळं चालले आहे, असा आरोपच यावेळी संजय राऊतांनी केला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे १०० टक्के शुद्ध मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रावर अन्याय झाला तर आवाज उठवणारे पक्ष होते. त्या दोन्ही पक्षांची वाताहात करुन भाजपाने दाखवून दिले की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतला आहे. मात्र या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातल्या जनतेचे धोरण आहे, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.