मुंबई : शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. भाजपला विरोधकांची भीती वाटत असल्यानेच हा प्रकार सुरू आहे, अशी टीका आता भाजपवर होत आहे. राज्यातील या राजकारणावर सामान्य जनतेतून असंतोष व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सीरिअल रेपिस्ट असतात तसे हे फोडाफोडी करणारे राजकारणातील सीरिअल रेपिस्ट, सीरियल किलर असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, फुटलेल्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करायला लावला. पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करणे यामागे दिल्लीचे डोके होते. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महाराष्ट्रातून नष्ट करायचे होते. तीच पद्धत त्यांनी राष्ट्रवादीबाबत अवलंबली. राष्ट्रवादी फुटली. पण त्याचवेळी त्यांनी या प्रमुख लोकांना पकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करायला सांगितला. गुन्हेगारांचीही मोडस ऑपरेंडी आहे. सीरिअल किलर आणि सीरिअल रेपिस्टची मोडस ऑपरेंडी असते, तसे हे राजकारणातील सीरिअल रेपिस्ट आहेत. सीरिअर किलर आहेत. त्याच पद्धतीची ही मोडस ऑपरेंडी आहे. पक्ष एकाच विशिष्ट आकड्यात फोडायचा आणि त्या गटाला पक्ष आणि चिन्हावर दावा करायला सांगायचा ही एकसारखी पद्धत अवलंबली गेली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव त्यांना नष्ट करायचे आहे. शरद पवार आणि त्यांचे राजकारण नष्ट करायचे आहे. स्वत: काही करायचे नाही. जे स्वत: इतिहास घडवत नाही, ते दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करत आहेत. महाराष्ट्रात तसे प्रयत्न सुरू आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी या महाराष्ट्रातून इतिहास पुसला जाणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला. शिवसेनेने कायदेशीर लढाई जिंकली आहे. महाराष्ट्रात शिंदेंसह फुटलेले आमदार अपात्र होतील. तोच निकाल राष्ट्रवादीबाबत लागू शकतो. विधीमंडळ पक्षातील फूट म्हणजे पक्षाची फूट नाही, विधीमंडळ पक्ष म्हणजे मुख्य पक्ष नाही हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हे राजकारण यशस्वी होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडल्याने महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात भाजपच्या इज्जतीचे वस्त्रहरण झाले आहे. त्यांची वैचारिक सुंता झाली आहे. मुलुंडचे पोपटलाल कालपर्यंत त्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते. भविष्यात ही वेळ तुमच्यावर येऊ शकते, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
अजितदादांसमोर शिंदे गटाचे लोंटांगण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांचे चरण स्पर्श केल्यान सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांना कंटाळून शिवसेना सोडल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांनीच अजित पवार यांना रेड कार्पेट अंथरल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला चांगलंच फैलावर घेतले. अजित पवार यांना कंटाळून आम्ही शिवसेना सोडत असल्याचे शिंदे गटाचे नेते बोलले होते. स्वत: एकनाथ शिंदे विधानसभेत यावर बोलले होते. काही नेते रडले होते. आता तेच राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. त्यांचे अश्रू पुसा. राष्ट्रवादी सत्तेत आली तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असे काही लोक म्हणत होते. मात्र तेच दादांसमोर लोटांगण घालत होते. राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून ज्यांनी शिवसेना सोडली, उद्धव ठाकरेंनी युती केली म्हणून त्यांचा स्वाभिमान उफाळून आला तेच राजभवनावर रांग लावून अजित पवारांना चरणस्पर्श करत होते, असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीस यांच्यावरही ताशेरे
राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा अविवाहीत राहीन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या प्रतिज्ञेवरूनही राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. आता ते विवाहीत आहेत. त्यामुळे मी शाप देऊ शकत नाही. हे बोगस राजकारणी आहेत. ते शब्दाला पक्के नाहीत, अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले. एवढे लोक फोडले त्याचा फायदा होणार की नाही याचा अंदाज आल्यावरच ते निवडणुका घेतील. जोपर्यंत त्यांना आत्मविश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत ते निवडणुका घेणार नाहीत. पण तुम्ही कितीही लोक फोडा; मुंबईसह ठाणे महापालिकेवर आमचाच झेंडा फडकेल. मुंबईला दोन वर्षापासून महापौर नाही, मुंबईला नगरसेवक नाही. तुम्ही जिथे मनमानी पद्धतीने मुंबईचे राज्य चालवत आहात. घ्या ना निवडणुका. आमची तयारी आहे, असेही ते म्हणाले.