फेरीवाला संरक्षण कायदा त्वरित लागू करा – संजय निरुपम
मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांवर जी कारवाई होत आहे ती योग्य नाही. अनधिकृत फेरीवाल्याचे आम्ही समर्थन करत नाही . मात्र २०१४ ला फेरीवाला संरक्षण कायदा लागू करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. फेरीवाला संरक्षण कायदा त्वरित लागू करावा अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली. फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने मंगळवारी निरूपम यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली.
गेली अडीच वर्षे हा कायदा लागू करण्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करत आहे, पण मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना भाजपलाच हा कायदा अंमलात आणायचं नाही असा आरोप निरूपम यांनी केला. या कायद्यानुसार मुंबईतील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून वर्गीकरण करण्याची गरज आहे. अधिकृत आणि अनधिकृत याची यादी तयार करून त्यानुसार फेरीवाल्यांना परवाने दिले पाहिजेत. फेरीवाला झोन तयार केले पाहिजेत. त्यासाठी टाउन प्लानिंग कमिटी स्थापन केली पाहिजे. या कमिटीमध्ये सर्व क्षेत्रातील म्हणजेच पोलिस, अग्निशमन दल, ट्राफिक, फेरीवाला संघटना तसेच काही सामाजिक संस्था यांचे सदस्य नेमले पाहिजेत. या कमिटीकडून सर्वे झाल्यानंतर अधिकृत परवाने देऊन मुंबईत ठिकठिकाणी फेरीवाला झोन तयार केले पाहिजेत, तेव्हाच हि समस्या सुटणार आहे असे निरूपम म्हणाले. मात्र मुंबई महानगर पालिका आणि शिवसेना भाजपा सरकार फेरीवाला संरक्षण कायदा लागू करण्यासाठी कोणतेच ठोस पाउल उचलत नाही आणि विनाकारण गरीब फेरीवाल्यांवर दररोज कारवाई करत आहेत. त्यांना पालिका अधिकारी, पोलिस, ट्राफिक, राजकीय नेते त्रास देत आहेत. असा आरेाप निरूपम यांनी केला.
कच- याचा जीआर रद्द करा
सर्व सोसायट्यांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून ठेवायचा असा जीआर काढला आहे. सुका कचरा मुंबई महानगरपालिका उचलणार आणि ओला कचरा सोसायटीनेच प्रक्रिया करून त्याचे खत तयार करायचे. यावर बोलतान निरूपम यांनी जीआर रद्द करण्याची मागणी केलीय. मुंबईकर सर्व कर भरतो. कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे पालिकेचे काम आहे. ते आपल्या जबाबदारीतून हात झटकत आहेत. मुंबईतील कचरा व्यवस्थापन करण्यात महानगर पालिका संपूर्णतः फेल झालेली आहे. या जीआरमुळे पालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार वाढून, सोसायटीला विनाकारण भुर्दंड बसणार आहे. ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोसायट्याकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे जबरदस्तीने इच्छा नसताना काही सोसायट्या ओला कचरा इतरत्र फेकतील त्यामुळे मुंबईत दुर्गंधी पसरेल. कचरा व्यवस्थापन हे मुंबई महानगर पालिकेचेच काम ते त्यांनीच करावे, असेही निरूपम म्हणाले.