बुलढाणा : एकिकडे महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे बुलढाणा मतदार संघातून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिंदे गटासह युतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत फूट पडल्याचीच चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची अजूनही उमेदवारी यादी जाहीर झालेली नाही येत्या दोन दिवसात ही यादी जाहीर हेाणार असल्याचे बोलले जातय. काही जागांच्या अदलाबदलामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून अंतिम जागा वाटप पूर्ण झालेले नाही. आज अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी आमदार गायकवाड यांनी दुपारी २ च्या सुमारास अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटाचे समर्थक हजर होते. तर मित्रपक्ष राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारी हजर नव्हते. मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता असतानाच आज गायकवाड यांनी तातडीने अर्ज दाखल केला. त्यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल केला आहे.