मोहन जोशी, पदमा तळवळकर आणि प्रभाकर कारेकर
यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पदमा तळवळकर, प्रभाकर कारेकर, यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने बुधवारी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष-2016 च्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती प्राप्त पुरस्कार्थींना 3 लाख रूपये रोख अंगवस्त्र आणि ताम्रपट प्रदान करण्यात आले. तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार्थींना 1 लाख रूपये रोख, अंगवस्त्र आणि ताम्रपट प्रदान करण्यात आले. यावर्षी 4 मान्यवरांना अकादमी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तर 43 कलाकारांना अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तबला वादक अरविंद मुळगावकर प्रकृती बरी नसल्यामुळे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.
चित्रपट तसेच नाटकातून अभिनय करणारे प्रसिद्ध कलावंत मोहन जोशी यांनी अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. यामध्ये आग-याहून सुटका, झालं गेलं गंगेला मिळालं, माझ छान चाललंय ना, मा. राष्ट्रपती, आंधळी कोशिंबीर, आसू आणि हसू, कलम 302, धर्मयुद्ध, लष्कराच्या भाक-या अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यासह 150 पेक्षा अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेले आहे. मोहन जोशी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
पदमा तळवळकर या शास्त्रीय गायिका आहेत. खयाल गायकीसाठी त्या प्रसिध्द आहेत. तळवळकर यांनी ग्वालेर, किराना आणि जयपूर घराण्यातून खयाल गायकीचे शिक्षण घेतलेले आहे. तळवळकर या जयपूर-अत्रौली घराण्याच्या आहेत. तळवळकर यांना भुलाभाई मेमोरियल ट्रस्टची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती, यासह राष्ट्रीय कला प्रदर्शन केंद्राची त्यांना फेलोशिप मिळाली. तळवळकर पंडित जसराज गौरव पुरस्कार 2004, श्रीमती वत्सला भीमसेन जोशी पुरस्कार 2009, राजहंस प्रतिष्ठान पुरस्कार 2010 ला प्राप्त झालेले आहे. पंडित प्रभाकर कारेकर हे शास्त्रीय गायक आहेत. त्यांचा जन्म गोव्याचा असून त्यांची संपूर्ण कारर्कीद ही मुंबईतील आहे. त्यांनी आग्रा घराणा आणि ग्वालेर घराण्यातून शास्त्रीय गायनाने धडे गिरविले. यासोबतच पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी आर व्यास यांच्याकडूनही त्यांनी गायनाचे धडे घेतले. आकाशवाणीवर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केलेली आहेत.