डोंबिवली: चैतन्यप्रभा मंडळाच्या अंतर्गत समर्थ व्याख्यानमालेचे १२ वे विचारपुष्प वैशाली कुलकर्णी यांनी २५ ऑगस्ट रोजी स्वामींच्या घरात गुंफले.
दिपप्रज्वलन झाल्यावर स्वामींच्या घराच्या विश्वस्त माधवी सरखोत यांनी स्वामींच्या घरातील नित्यनेमाने चालणा-या सेवाभावी व सामाजिक उपक्रमाची माहिती सांगून सर्वांचे स्वागत केले.यानंतर प्रमुख व्याख्यात्या वैशाली कुलकर्णी यांचा परिचय स्मिता तळेकर यांनी करून दिल्यावर माधवी सरखोत यांनी वैशाली कुलकर्णी यांचा श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ आणि धनादेश देऊन सत्कार केला.
महाभारतातील स्त्रिया या विषयावर बोलताना कुलकर्णी यांनी रसाळ शैलीत गंगा, सत्यवती,अंबा, कुंती, द्रौपदी, गांधारी आणि उत्तरा यांचा क्रमाक्रमाने परिचय करून दिला.या मानिनींची कुळकथा त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये . त्यांच्या वाटेला आलेले सुखदुःखादी क्षण त्यांचा स्वाभिमान, त्यांची तेजस्विता व त्यांची अस्मिता सांगून साक्षात महाभारतच डोळ्यासमोर उभे केले.या भाषणाला श्रोत्यांनी दाद दिली.
या कार्यक्रमाचा संत साहित्यीका डॉ.अनुराधा कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण समारोप करून सर्वांचे आभार मानले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना गोडखिंडी यांनी केले.