मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. राजवाडी रुग्णालयात २४ तासांहून अधिक काळ पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती.जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल.यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल असे मुख्यमंत्रयांनी सांगितले.
मुंबईच्या साकीनाका भागात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. संपूर्ण घटना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बलात्कारानंतर, आरोपीने पीडितेला अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर फरार झाले. पीडितेला एका टेम्पोमध्ये फेकण्यात आले होते.