आरटीआय कार्यकर्त्यांना चाप लावण्यासाठी गुन्हे दाखल करा
सदाभाऊ खोत यांचे खळबळजनक वक्तव्य
सांगली – शासनाच्या विविध विभागात माहिती अधिकार कायद्याखाली विनाकारण अर्ज दाखल करून माहिती मागवणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना चाप लावण्यासाठी गुन्हे दाखल करा असे खळबळजनक वक्तव्य कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत दिशा समितीच्या बैठकीत केले.
केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची सभा आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यावेळी उपस्थित होते.
केंद्राच्या एकेक योजनांचा आढावा घेत असताना कृषि विभागाचा विषय मांडला गेला. शेडनेट, पॉलिहाऊस प्रस्तावावर चर्चा झाली. चर्चेवेळी कृषि अधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या. आरटीआय’ कार्यकर्त्यांचा मुद्दाही चर्चेत आला. त्यावेळी सदाभाऊ संतापले. त्यावेळी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “आरटीआय’ अंतर्गत सर्वच विभागात विनाकारण अर्ज दाखल करून माहिती मागवण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. एक-दोन व्यक्तीच एकाचवेळी सर्व ठिकाणी अर्ज दाखल करत आहेत. “आरटीआय’ चा गैरवापर केला जात असल्याचे दिसून येते. सर्व विभागाकडील अर्ज एकत्र मागवून पडताळणी केल्यास ठराविक जणच अर्ज दाखल करतात असे दिसून येते. अशा आरटीआय कार्यकर्त्यांना चाप लावण्याची गरज आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात अशा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत असेही सदाभाऊ म्हणाले. “आरटीआय’ कार्यकर्त्यांमध्ये काही वकीलमंडळीही सहभागी आहेत. त्यांच्याविषयी बार असोसिएशनकडे तक्रार केली जाईल. कार्यकर्त्यांच्या अर्जामुळे शासनाच्या विविध विभागातील अधिकारी वैतागले आहेत. हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे आणि अर्जदार मात्र वेगवेगळे असे प्रकार निदर्शनास येत असल्याचे सदाभाऊ म्हणाले. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा माहिती अर्जांची छाननी करून कारवाई करावी. अलिकडच्या काळात काही “आरटीआय’ कार्यकर्ते वेगवेगळी माहिती मागवून अधिकाऱ्यांना गुंतवून ठेवत आहेत. त्यामुळे विकासाला खीळ बसत आहे. कृषी विभागामध्ये तर असे अर्ज भरपूर असल्याची माहिती पुढे आली आहे. अशांची माहिती घेऊन गुन्हे दाखल करा असे आदेश वजा सूचनाही त्यांनी दिल्या.