विरोधकांचा ‘हल्लाबोल’ मोर्चा नव्हे, तर ‘डल्ला मार’ मोर्चा – सदाभाऊ खोत
नागपूर – विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आव आणण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. विरोधकांचा हा हल्लाबोल मोर्चा नसून हा ‘डल्ला मार’ मोर्चा असल्याची टीका राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नागपूर येथे केली.
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या-कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर अविरत काम करत आहे. यातूनच सरकारने देशभरात ऐतिहासिक कर्जमाफी केली. आघाडी सरकारने सन २००८ साली केलेल्या कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी चौपट आहे. २००८ सालच्या कर्जमाफीचे पैसे द्यायला आघाडी सरकारला दोन वर्षे लागली. मात्र या सरकारने अवघ्या सहा महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे असेही सदाभाऊ म्हणाले. विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे विरोधक नसलेले मुद्दे उकरून काढत आहे. सरकार कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार आहे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.