शेतकऱ्यांसाठी लढलो, नाटकी आंदोलन केली नाही : सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानच्या नेत्यांना टोला
अकोला : शेतकऱ्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी मर्दा सारखा लढलो. पोलिसांच्या अनेक काठ्या खाल्या, पण हार मानली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतांना कार्यकर्त्यांना पुढे करून आम्ही कधी नाटकी आंदोलने केली नाहीत असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे नाव न घेता लगावला.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे रयत क्रांती संघटनेतर्फे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सदाभाऊ म्हणाले की, काही जण म्हणतात सदाभाऊंना सत्तासुंदरीची भुरळ पडली. पण मुंबईला येऊन पहा. माझ्या बंगल्यात मी केवळ दोन-तीन दिवस राहतो. माझा बंगला हा राज्यातील रुग्ण, शेतकरी व कार्यकर्त्यांसाठी सदैव खुला करून दिला आहे. हॉलमध्ये खाली सतरंजीवर झोपणारा हा सदाभाऊ असून मंत्री पदाचा तोरा दाखवित तुमच्या सारखी नाटके करीत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करून काही जण आपल्या दुकानदाऱ्या चालवित आहेत. पण माझा शेतकरी बांधव एवंढा भोळा नाही. त्यांना तुमच्या “कथणी आणि करणी’ मधील फरक दिसतोय. कर्जमाफी, तुर, सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे आग्रही भुमिका मांडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात 1400 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावर सरकार शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करीत असून प्रती हेक्टरी पंधरा क्विंटल सोयाबीन स्विकारण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रयत क्रांती संघटन सदैव तत्पर आहे. कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे दुखः समजून घेत त्यांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक गावात रयत क्रांतीचे आरोग्य बुथ उभारा. रुग्णांना घेऊन मुंबईला या, त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची आम्ही व्यवस्था करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शार्दुल जाधवर, युवा नेते सागर खोत, राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे, जितू अडेलकर, विनायक सरनाईक, प्रशांत ढोरे पाटील, दीपक सुरवडकर, संतोष राजपुत, विनायक पाटील, अरविंद पाटील, गजानन तुरे, अनंत आमले यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, मजुर, रयतक्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.