बेकायदेशीर व्होटींग पोल विरोधात रिपाइंची सायबर क्राईमकडे तक्रार
डोंबिवली : स्मार्ट पोल डॉट नेट या वेबसाइटच्या माध्यमातून कल्याण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बेकायदेशीरपणे व्होटींग पोल सरू असल्याने त्या विरोधात रिपाइंचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून स्मार्ट पोल डॉट नेट या वेबसाइटवर रिपाइंचा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष कोणाला केला पाहिजे यासाठी एक व्होटींग पोल सुरू आहे. यासंदर्भात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून असा कोणताच निर्णय झालेला नाही. त्यांचाच निर्णय हा पक्षात अंतिम समजला जातो. त्यांच्याच आदेशानुसार कल्याण जिल्हाध्यक्षपदासाठी माझी निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही व्होटींग पोल घेण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र व्होटींग पोलच्या माध्यमातून पक्षाची व माझी बदनामी केल्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष जाधव यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुणगेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी रिपाइचे युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव, कल्याण शहर अध्यक्ष रामा कांबळे, जिल्हा सचिव रमेश बर्वे, सागर पगारे, आदी उपसिथत होते.