डोंबिवलीत १४ एप्रिलपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा साकारणार
महापौरांच्या आश्वासनानंतर रिपाइंचे उपोषण मागे
डोंबिवली : पूर्वेकडील इंदिरा चौकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत आठ वर्षापूर्वी मंजूर झाला होता. मात्र पालिका प्रशासन ठरावाची अंमलबजावणी करत नसल्याने डोंबिवली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी इंदिरा चौकात एक दिवसीय उपोषण करण्यात आले. अखेर महापौर राजेंद्र देवळेकर आणि सभागृह नेते राजेश मोरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन १४ एप्रिल २०१८ पर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर रिपाइंने उपोषण मागे घेतले.
रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यांनी उपोषण छेडले होते. यामध्ये युवक जिल्हा अध्यक्ष जय जाधव , युवक अध्यक्ष सतीश पवार , डोंबिवली शहर उपाध्यक्ष वसंत टेकाळे , राजू तुपे , शहर सचिव दिनेश साळवे , कार्याध्यक्ष किशोर मगरे , उपाध्यक्ष दिलीप काकडे , संपर्क प्रमुख तुकाराम पवार , संघटक प्रमुख समाधान तायडे, युवक आघाडी डोंबिवली शहर सचिव महेश येवले , महिला संघटक ज्योत्स्ना रोकडे यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते. डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी रिपाईने प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळेच उपोषण करण्याची वेळ आल्याचे रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी सांगितले. कॉंग्रेसचे स्थानिक नेते संतोष केणे यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. रिपाइंच्या उपोषणाची दखल घेत महापौर देवळेकर आणि सभागृह नेते राजेश मोरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. महापौरांनी शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता केली.उपोषणानंतर पालिकेने पुतळा बसविण्यात येणा- या जागेची साफ सफाई केली .