मुंबई : रिपाइं ( रिफॉर्मिस्ट ) चे संस्थापक अध्यक्ष समाधान नावकर यांचे शनिवारी कोरोनामुळे निधन झालय. मृत्यूसमयी ते ६० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले २ मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर ठाण्याच्या मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार पार पडले.
ठाण्यात राहणारे समाधान नावकर हे माजी आमदार दिवंगत टी एम कांबळे यांच्या रिपाइं ( डेमॉक्रॅटिक) या पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते. कांबळे यांच्या निधनानंतर त्यांनीं रिपाइं ( रिफॉरमिस्ट) या नवीन पक्षाची स्थापना केली. पक्षाची नोंदणी केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. अवघ्या काही महिन्यातच त्यांनी महाराष्ट्रभर पक्षाची मोर्चेबांधणी केली. नावकर हे तळागाळातून आलेले हाडाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठया प्रमाणात होता. पक्ष स्थापनेपासूनच आम्ही त्यांच्यासोबत होतो. अवघ्या काही महिन्यातच त्यांनी पक्षाची घडी बसवली होती, त्यांच्या निधनामुळे रिपब्लिकन चळवळीचे खूप मोठं नुकसान झालंय, त्यांच्या निधनाने चळवळीत मोठी पोकळी निर्माण झालीय. अशी भावना त्यांचे विश्वासू सहकारी व रिपाइं ( रिफॉरमिस्ट) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष बनसोडे यांनी व्यक्त केली. नावकर यांच्या अकाली निधनामुळे रिपब्लिकन चळवळीतील कार्यकत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.