मुंबईत आरपीएफ पोलिसांची दादागिरी : मोफत जेवण न दिल्याने कॅंटीनच्या मॅनेजरला मारहाण
घाटकोपर ( निलेश मोरे ) : खाकी वर्दी सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा खात्मा करण्यासाठी असते . मात्र त्याच खाकी वर्दी मध्ये जेव्हा दुर्जन स्वभाव निर्माण होतो तेव्हा सज्जनाचा छल सुरु होतो . तेव्हा अशा सज्जन व्यक्तींनी न्याय मागायचा कुठे असा प्रश्न पडतो . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या नीलम फूड प्लाझा या कॅंटीनमधील मॅनेजर गोलेक किशोर बेहरा याला आरपीएफ पोलिसांकडून झालेल्या शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी सीएसटीएम रेल्वे पोलीस ठाण्यात तीन आरपीएफ पोलिसां विरोधात तक्रार नोंद झाली आहे . सदर लेखी तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी आरपीएफ पोलिसांकडून अज्ञात गुंड पाठवून फिर्यादीला गेल्या तीन महिन्यापासून धमक्या दिल्या जात आहेत .
मिळालेली अधिक माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील नीलम फूड प्लाझा या कॅंटीनमध्ये सीएसटीएम रेल्वे पोलीस ठाण्याचे तीन आरपीएफ पोलीस शाम यादव व त्यांचे दोन साथीदार नशा करून दिनांक 2 सेप्टेंबर 2017 रोजी रात्री 12;35 च्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले असता पोलिसांनी कॅंटीनचे कुपन न काढता मोफत जेवण देण्याची मॅनेजरकडे मागणी केली . कॅंटीनचे मॅनेजर गोलेक बेहरा यांनी पोलिसांना कुपन घेण्यासाठी विनवणी केली असता आरपीएफच्या पोलिसांनी मॅनेजरची कॉलर पकडून शिवीगाळ करत मारहाण केली . व हम से पैसे मांग रहे हो तुम लोग बाहर आओ तुम लोगोंको अंदर कर दूंगा अशी धमकी दिली . मॅनेजरला वाचवण्यासाठी आलेल्या कॅंटिनमधील कारागिरांना देखील पोलिसांनी मारहाण केली . या घटनेचा संपूर्ण दाखला कॅंटिनमधील असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झाले असून . आरपीएफ पोलिसांकडून विनाकारण झालेल्या शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी मॅनेजर गोलेक बेहरा यांनी सीएसटीएम रेल्वे पोलीस ठाण्यात 4 सेप्टेंबर 2017 रोजी लेखी तक्रार नोंद केली . दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी कॅंटीनचे मॅनेजर गोलेक बेहरा यांना अज्ञात गुंडांकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहे . दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी रात्री 11;30 वाजता कॅंटीनचे काम आवरून मॅनेजर घरी परतत असताना रस्त्यात काही अज्ञात गुंडांनी त्यांना पुन्हा धमकावत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता मॅनेजर गोलेक बेहरा यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली . पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे .