कल्याण :- इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून मोबाईल आणि लॅपटॉप चा इंटरनेटसाठी वायफाय राउटर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. वायफाय राऊटरचा स्पोर्ट होऊन जखमी झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चाैधरी चाळीतील एका घरात घटना घडली आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटा प्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायम शेख यांच्या घरात केबल वायफायच्या राऊटरचा ब्लास्ट झाला. या घटनेत सायम यांची दहा वर्षाची मुलगी नाजमीन ही भाजली आहे. तिचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले आहेत. तिच्यावर मिरा रुग्णलायात उपचार सुरु आहेत. सायमा यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी ही महिला ८० टक्के भाजली आहे. तर तिचा तीन महिन्याचा लहान मुलगा अरमान हा ५० टक्के भाजला आहे. या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.