नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यावर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी, चहापानाऐवजी पुढच्यावेळी पानसुपारीचा कार्यक्रम ठेवण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी आज, बुधवारी विरोधकांना लक्ष्य केले. कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय महत्त्वाचा आहे, यावर चर्चा करण्याकरिता चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु त्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे चहापाण्याच्या कार्यक्रमाऐवजी पुढच्या वेळेस पानसुपारीचा कार्यक्रम ठेवण्याचा आमचा विचार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
त्यावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याच्या विरोधी पक्षाच्या निर्णयावर टीका करताना पुढील वेळी चहापानाऐवजी केवळ पान-सुपारी ठेवावी लागेल, असा उल्लेख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला. पण जनतेच्या तोंडाला पाने पुसून केवळ विरोधी पक्षांना फोडण्याची सुपारी घेतलेले हे सरकारच मुळात ‘पानसुपारी सरकार’ आहे, हे आता लपून राहिलेले नाही, असे त्यांनी सुनावले आहे.
राज्यातील बेरोजगारी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, पेपरफुटी, गुन्हेगारी, मंदावलेली गुंतवणूक, जाती-जातीत निर्माण झालेला तणाव, इतर राज्यांत जाणारे उद्योग अशा अनेक प्रश्नांमुळं युवा, शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार, व्यावसायिक या सर्वच घटकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यावर बोलण्याऐवजी हे सरकार केवळ शाब्दिक फुलोरे तयार करीत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पण या गोंधळलेल्या निकामी सरकारला वठणीवर आणण्याचे काम, विरोधी पक्ष म्हणून आम्ही अधिवेशनात नक्की करू, असे त्यांनी म्हटले आहे.