ब्रिटन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनचं पंतप्रधानपद मिळवणारे ऋषी सुनक पहिले भारतीयं वंशाचे व्यक्ती ठरलेत. सुनक हे गेल्या 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.
किंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती केली आहे. ऋषी सुनक यांनी मंगळवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी त्यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले.
ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीच्या आधीपासूनच त्यांच्या भारतीय कनेक्शनवर चर्चा चालू आहे. इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. सुनक यांची पंतप्रधानपदी निवडीची बातमी येताच मूर्ती परिवारावर देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ऋषी सुनक यांचा जीवन परिचय
सुनक गुजरानवाला येथील ब्राह्मण कुटुंबातील आहे.सुनकचा जन्म १२ मे १९८० रोजी साउथम्प्टन , हॅम्पशायर, इंग्लंड येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव यशवीर आणि आईचे नाव उषा सुनक. तीन भावंडांपैकी ते सर्वात मोठे आहेत. त्यांच्या आजी-आजोबांचा जन्म भारतातील पंजाब प्रांतात झाला आणि १९६० च्या दशकात पूर्व आफ्रिकेतून आपल्या मुलांसह यूकेमध्ये स्थलांतरित झाले. ऑगस्ट २००९ मध्ये सुनकने भारतीय अब्जाधीश, इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी लग्न केले. स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना त्यांची भेट झाली आणि त्यांना दोन मुली आहेत.
शिक्षण
सुनक यांचे शालेय शिक्षण विंचेस्टर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी लिंकन कॉलेज, ऑक्सफर्डमधून तत्त्वज्ञान , राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात प्रथम पदवी मिळवली. २००६ मध्ये, त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली .
राजकीय जीवन
रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार ऋषी सुनक २०१५ मध्ये पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यावेळी त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यामुळे पक्षातील त्यांचा दर्जा वाढतच गेला. ऋषी सुनक यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सरकारचे संसदीय उपसचिव म्हणून काम केले. थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर, सुनक यांनी बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह नेते होण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिला. जॉन्सनची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर, सुनक यांची ट्रेझरीचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुलपती म्हणून, सुनक यांनी युनायटेड किंगडममधील कोविड-19 महामारीच्या आर्थिक परिणामाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आर्थिक धोरणावर ठळकपणे काम केले.