बेजबाबदार चालकाला ठोठावला 8.600 हजाराचा दंड
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर भागातून एक रिक्षावाला आयरे रोड भागातील मढवी शाळेकडे त्याच्या रिक्षातून तीन विद्यार्थ्यांना घेऊन बुधवारी सकाळी चालला होता. मानपाडा रोडला असलेल्या चार रस्त्यावर येताच चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली रिक्षा तिरपी झाल्याने चालक बाहेर फेकला गेला. याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला जोराची धडक बसल्यामुळे भरधाव रिक्षा पलटी झाली. मात्र पादचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रिक्षातील चमुरड्या विद्यार्थ्यांना कोणताही धोका पोहोचू शकला नाही.
रमेश तुळशीराम बागुल (48, रा. भोपर रोड, देसलेपाडा) असे रिक्षावाल्याचे नाव आहे. या अपघातात त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. रिक्षा चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. त्याच्याजवळ रिक्षाची अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्याच्या वाहनाचा विमा देखिल संपला आहे. रिक्षा चालविणारा चालक रमेश बागुल हा अवैधरित्या विद्यार्थी आणि प्रवाश्यांची वाहतूक करत असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.
डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांनी चालक बागुल याला मोटार वाहन कायद्याने ८ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला. तसेच या रिक्षा चालकावर अत्यावश्यक कारवाईसाठी कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाला कळविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आफळे यांनी सांगितले. या अपघात प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नसल्याचे वपोनि आफळे यांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले.