गटारे तुंबून शौचालयाचे सांडपाणी रहिवाशांच्या घरांत, दुर्गंधीसह रोगराई पसरण्याची भीती

.डोंबिवली :  पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील चेरानगर (सांगाव) येथील स्वप्न साकार इमारतीतील रहिवाशी अक्षरश: नरकयातना भोगत आहेत. रहिवाशांच्या घरांसमोर शौचालय व गटारातील सांडपाणी येत असल्याने सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी कुणाचेही लक्ष नाही.

या भागात अनेक इमारती उभ्या राहिल्या असून त्या इमारतींचे सांडपाणी आणि मैला वाहून जाण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. इमारती बांधताना राहिलेला माल आणि डेब्रिज तेथेच टाकून ठेवल्याने जागोजागी उंदीर, घुशींनी मोठ-मोठी बिळे केली आहेत. उंदीर-घुशीं प्रमाणेच अधूनमधून सापांचाही याठिकाणी वावर असतो. या इमारतींतील रहिवासी त्या ठिकाणी कचरा टाकतात. हा कचरा वाहून गटारांमध्ये अडकतो. गटारे तुडूंब भरली जात असल्याने ते सांडपाणी स्वप्न साकार इमारतीतील रहिवाशांच्या दारात जाते. येथेच या इमारतीची पाण्याची टाकी देखील आहे. त्यामुळे रहिवासी कमालीचे चिंतेत आहेत. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून एखाद्या संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास त्याचे विपरीत परिणाम रहिवाशांना भोगावे लागणार असल्याचे दिसते.

ग्रामपंचायतीनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आजवर याठिकाणी कुठलीही स्वच्छता राबवलेली नाही. तसेच गटारांची साफसफाई देखील केलेली दिसत नाही. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असल्याने या परिसराला कोणी वाली आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कचऱ्याचे ढिग, तुंबलेली गटारे, साचलेले सांडपाणी, दुर्गंधी, उंदीर-घुशींचा मुक्त संचार सुरू झाल्याने या भागात सद्या मोठी दुरावस्था झाली आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रहिवाशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. परिणामी रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पालिका प्रशासनाचे या परिसराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवासी समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराविषयी रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *