कल्याण (प्रतिनिधी ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत उघडकीस आलेला महारेरा सर्टिफिकेट घोटाळा आता चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये उद्योजकांसह भूमालकांची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात बांधकामे झाली आहेत. त्यांना देखील दोषी ठरवून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी दिले होते.
राज्यातील पहिला महारेरा सर्टीफिकेट घोटाळा कल्याण डोंबिवलीत समोर आलाय. या घोटाळ्यात आता पर्यंत ६५ बिल्डरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर यांत ५ जणांना अटक झाली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असं मत आता तपास यंत्रणांचे झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हा एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र हि बांधकामे एका दिवसात झालेली नाहीत. त्यामुळे ज्या बांधकामांना भू-मालक आणि बिल्डर जेवढे जबाबदार आहेत तेवढेच अधिकारी देखील आहेत.कारण एका दिवसात हि बांधकामी झालेली नाहीत. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दोषी ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती कडे केली आहे.