येत्या ९ एप्रिलला सोमय्या मैदानावर मेळावा,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

 मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून,  येत्या ९ एप्रिल रोजी सायंकाळी  ५ वाजता मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,

या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दिपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश महातेकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे  मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे आदी उपस्थित होते.

अविनाश महातेकर यांनी सांगितले की, नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत त्यामुळे रिपब्लिकन पक्षात चैतन्याचे वातावरण आहे.  सध्याचे राजकीय वातावरण हे दुषित झालं आहे. मात्र रिपाइंची स्वतंत्र भूमिका असून मुंबईच्या प्रश्नावर या मेळाव्यात चर्चा होणार आहे.

राज्य सरकारकडून ७५ हजार कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येत आहे यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,  राज्य सरकारमधील आम्ही एक घटक असलेा तरी पक्षाची भूमिका म्हणून कंत्राटी पध्दतीला रिपाइंचा विरोध आहे. २४, २५ व्या वर्षी तरूण कंत्राटी पध्दतीवर कामावर लागल्यानंतर कालांतराने ३०,३५ वय वाढल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळणे मुश्किल होते.

त्यामुळे राज्य सरकारने सरळ सेवा पध्दतीने भरती करावी अशी रिपाइंची मागणी असल्याचे महातेकर यांनी सांगितलं. देशातील लोकशाही संपुष्टात येईल. हुकूमशाही पध्दतीने देश चालेल. यावर माझा कोणताही विश्वास नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच देश चालणार आणि चालत राहणार आहे. त्यामुळे हुकूमशाही पध्दत येणार नाही. लोकशाही अबाधित आहे.

आपल्या देशातील लोकशाहीमुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर हजारो कोटीचे कर्ज मिळते असेही महातेकर म्हणाले. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये रिपाइंला वाटा मिळाला नाही या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, फडणवीस सरकारच्या काळात रिपाइंचा आमदार नसताना राज्यमंत्री पद मिळालं होतं. आताही रिपाइंचा एकही आमदार नाही, तसेच मंत्रीमंडळ विस्तारही झालेला नाही. त्यामुळे तो जेव्हा होईल, तेव्हा रिपाइंला सत्तेत नक्कीच वाटा मिळेल असे त्यांनी स्पष्ट केल.

मुंबई महापालिका निवडणुकीत ३० जागांवर तयारी !

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हयात आणि तालुक्यात रिपाईंचा मेळावा होणार आहे. मुंबईतून मेळाव्यास सुरूवात होणार आहे. रिपाइंची संघटनात्मक बांधणी हा मुख्य हेतू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा महत्वाचा ठरणार आहे. रिपाइंने ३० जागांवर लढण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र निवडणुक जागा वाटपाच्या वेळी भाजप बरोबर चर्चा होऊन वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असे राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी सांगितले. मुंबई प्रदेश मेळाव्यात सुमारे १० ते १५ हजार रिपाइं कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वास प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!