ट्रॅफिक डीसीपींची भेट घेत सुचवल्या उपाययोजना
कल्याण दि.16 जुलै : गेल्या कित्येक महिन्यांपासून नाहक त्रास सहन करणाऱ्या कल्याणकरांची वाहतूक कोंडीची चक्रव्यूहातून सुटका करा असे साकडे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी ट्रॅफिक डीसीपीना घातले आहे. कल्याण पश्चिमेतील त्यातही विशेषतः स्टेशन परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्याबाबत समेळ यांनी वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ. विनय राठोड यांची भेट घेतली.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण शहरात होणारी वाहतूक कोंडी कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या अंगवळणी पडू लागली आहे. त्यातही कल्याण रेल्वे स्टेशन परिसराचे नाव निघताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. इतकी इथल्या वाहतुक कोंडीची भयानक परिस्थिती झाली आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थ्यांसोबत कामावर जाणाऱ्या हजारो नागरिकांना होत आहे. दोनच दिवसांपूर्वी तर कल्याणमध्ये तर अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाढत्या वाहतूक कोंडीवर वेळीच उपाय योजना न केल्यास ही समस्या हाताबाहेर जाण्याची भीती श्रेयस समेळ यांनी वाहतूक पोलिसांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
तर कल्याण शहर आणि कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मांडण्यासोबतच समेळ यांनी ही कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचे पर्यायही सुचवले आहेत.
वन वे ची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, भिवंडीवरून येणाऱ्या रिक्षांना रेल्वे स्टेशन ऐवजी बैल बाजार परिसरात थांबवून गोविंदवाडी बायपास मार्गे परत पाठवावे, छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भिवंडीच्या रिक्षांना हटवणे, जड – अवजड वाहने आणि खासगी बसेसना मुख्य रस्त्यांवर प्रवेश बंद करणे, वाहतूक कोंडीस कारणीभूत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणे, मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा बसवणे, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाले – फूडस्टॉल यांच्यावर कारवाई करणे यांसारखे महत्त्वाचे उपाय समेळ यांनी या पत्राद्वारे सुचवले आहेत. त्यावर ट्रॅफिक डी सी पी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती श्रेयस समेळ यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे. दरम्यान समेळ यांनी सुचवलेल्या या सर्व उपायांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास कल्याण शहरासह मुख्यत्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यासाठी निश्चितच मदत होईल.