कल्याण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण परिसरातील सरकारी जमिनीवर वर्षोनुवर्षे राहत असलेल्या रहिवाशांना ७ दिवसाच्या आत जागा खाली करण्याच्या नोटीसा कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांनी बजावल्या आहेत. दरम्यान या नोटीसीमुळे हजारो सर्वसामान्य गरीब कुटूंब भयभीत झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांना दिलासा देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी कल्याणचे माजी महापौर रमेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दहा हजाराहून अधिक कुटूंबे ही १९९५ पूर्वी पासून रहात असून, गेल्या तीन ते चार पिढया वास्तव्य करीत आहेत. मात्र कल्याणचे तहसीलदारांनी गायरान, गावठान गुरचरण या जागेवर राहणा-या रहिवाशांना सरसकट नोटीसा बजावून सात दिवसाचे आत जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. तहसील कार्यालयाकडून आलेल्या नोटीसीमुळे हजारेा कुटूंब चिंतेत सापडले आहेत. भूमाफीयांनी शासन, महापालिकेतील कर्मचारी, बॅका यांच्या संगनमताने अनेक गरीब गरजू लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. माञ या निर्णयामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे असेही जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे या परिस्थितीवर धोरणात्मक निर्णय घेऊन रहिवाशांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी जाधव यांनी केली आहे.