त्या तरुणाची अशीही समाजसेवा ……
डोंबिवली / शंकर जाधव : समाजकार्य करायचे ठरवले तर ते कोणत्याही पद्धतीने करता येते. त्यासाठी असावी लागते ती इच्छाशक्ती …भांडूप मधील समाजकार्याला वाहून घेतलेला असा एका तरुण आहे जो प्रत्येक महिन्यातले दोन दिवस ठाणे ते बदलापूर रेल्वे स्थानकावरील वास्तव करणाऱ्या मनोरुग्ण, भिकारी आणि अंध, अपंग व्यक्ती यांचे मोफत केस कर्तन आणि दाढी करण्याचे काम करत आहे.
भांडूप येथील रवींद्र बिरारी यांचे हेअर कटिंग सलून आहे. आपला व्यवसाय सांभाळून ते गेली सात ते आठ वर्ष मनोरुग्ण, भिकारी आणि अंध, अपंग व्यक्ती यांचे मोफत केस कर्तन आणि दाढी करण्याचे काम करत आहे. त्याच्या सेवाभावी वृत्तीचे समाजात कौतुक होत असले तरी त्यांनी कधीही यांची प्रसिद्धी केली नाही.एवढेच नव्हे तर रविंद्र हे मनाला समाधान मिळतंय म्हणून काम करायचं हा साधा विचार मनाशी ठेवून आदिवासी खेड्या- पाड्यात मुलांना शैक्षणिक साहित्य ,पाड्यावर धान्य देत असतात. हे काम करत असताना अनेकवेळा मनोरुग्ण त्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडलेत पण त्यांनी हे काम काम थांबवले नाही. त्यांच्या या सेवाभावीवृत्तीचा गौरव म्हणून त्यांना नुकतेच झालेल्या ‘टिटवाळा महोत्सवात २०१८ ‘मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या कामाविषयी बोलताना रविंद्र म्हणतात की, आपण पैशाची मदत करू शकलो नसलो तरी सुध्दा आपल्याकडे जे सहज करण्यासारखे आहे ती मदत नक्कीच करू शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सेवाभावी वृत्ती बाळगली पाहिजे असे मत ते व्यक्त करतात.