कल्याण पश्चिमेच्या ऋतू गृहसंकुलातील रहिवशांचा पुढाकार

कल्याण : ढोल ताशांचा गजर त्याला सुमधुर अशा टाळाची साथ आणि सोबतीला जय श्रीरामचा गगनभेदी जयघोष…अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणामध्ये कल्याणात रावण दहनाचा सोहळा संपन्न झाला. कल्याण पश्चिमेच्या ऋतू गृहसंकुलातील रहिवाशांच्या पुढाकाराने आपली परंपरा आणि संस्कृती जपत हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

विजया दशमी म्हणजे अर्थातच दसरा. सत्याचा असत्यावर तसेच सत् प्रवृत्तींनी अपप्रवृत्तींवर मिळवलेला विजय म्हणून या दिवसाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर ऋतू गृहसंकुलातील रहिवाशांतर्फे अतिशय नेटक्या पारंपारीक पद्धतीने काल हा सोहळा साजरा करण्यात आला. यंदाच्या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते. प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमानाच्या अतिशय मनमोहक अशा वेषात दाखल झालेल्या चिमुरड्यांच्या मिरवणुकीने या सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यासोबतच दांडपट्टा, लाठीकाठीचे जबरदस्त प्रात्यक्षिक आणि त्यानंतर ऋतू संकुलातील महिलांनी पारंपारिक वेषात विठ्ठल…विठ्ठल गाण्यावर सादर केलेल्या अप्रतिम अशा टाळ नृत्याने सर्वांचीच मने जिंकली.

तर या कार्यक्रमादरम्यान युवा शिल्पकार सिद्धार्थ साठे, लष्करातील निवृत्त कॅप्टन विवेक घाडगे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच युवा पिढीकडून आपली संस्कृती आणि परंपरेचे जतन केले जात असल्याबद्दल शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी आयोजकांचे यावेळी कौतुक केले.

भाजपचे कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार, शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सी एम डी बिपिन पोटे, वेदांत हॉस्पिटलचे डॉ. पराग मिसाळ, कल्याण पश्चिम भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सौरभ गणात्रा, मधुकर फडके आदी मान्यवरांच्या हस्ते रावण दहनाचा सोहळा संपन्न झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋतू संकुलातील सोनाली बोबडे, मानसी जोशी मेंडकी, अनिरुध्द मेंडकी, संदीप बोबडे यांच्यासह जितेंद्र मुरांजन, साहिल महाजन, विलास आव्हाड,पंकज आणेकर, अमित जोशी, आनंद देशपांडे, अन्वेश जोशी यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!