रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार, उपजिल्हाप्रमुखांसह शेकडो पदाधिकारी भाजपात दाखल
राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली कार्यालयात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम
रत्नागिरी : रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार पडलय. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष भय्याजी मलुष्टे, माजी पंचायत समिती सदस्य नदीम सोलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश कृष्णाजी सावंत (राजापूर), डॉ. अभय धुळप, राजा हेगीष्टे, सुनील गजने, रामदास शेलटकर यांच्यासह रत्नागिरीतील शेकडो शिवसैनिकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. रत्नागिरी व सिंधूदुर्गचे संपर्क मंत्री तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार विनयजी नातू आदी उपस्थित होते. राज्यमंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील कार्यालयात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुकांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली. त्यामुळे राज्यात भाजपची ताकद वाढलीय. कोकणातही भाजपची ताकद वाढत आहे. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे कोकणातील ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर आणि डहाणू या पाच जिल्हयांचे संपर्कमंत्री म्हणूनही जबाबदारी आहे. त्यामुळे कोकणात भाजपचे वर्चस्व वाढविण्यासाठी रविंद्र चव्हाण चांगलेच सक्रिय झाले आहेत. रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार पाडण्यात चव्हाण यांना यश आलय. उपजिल्हाप्रमुखांसह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने रत्नागिरीत भाजपची ताकद अधिकच वाढलीय.
डोंबिवलीत कार्यालयात असा पार पडला पक्ष प्रवेश