नवी मुंबई : रायगड – ठाणे- नवी मुंबई वारकरी संप्रदाय यांच्या वतीने दि ४ फेब्रुवारी २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान सेंट्रल पार्क मैदान, खारघर येथे “राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाचे मुख्य कार्यालय गावदेवी मैदान, सेंट्रल पार्कजवळ खारघर येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते बबन पाटील, ह.भ.प. धनाजी महाराज, ह.भ.प. पुंडलिक महाराज, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज, ह.भ.प. मोहन म्हात्रे, ह.भ.प. संतोष केणे, ह.भ.प. अजय पाटील, ह.भ.प. गोरख महाराज घाडगे, ह.भ.प. मच्छिंद्र भोईर, ह.भ.प. कृष्णा महाराज, ह.भ.प. अरूण वायले, ह.भ.प. मनोहर कडू, ह.भ.प. हरेश डायरे, ह.भ.प. हनुमान महाराज, नगरसेवक हरीष केणे, ज्ञानेश्वर पाटील, शशिकांत म्हात्रे, अॅड नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, वसंत जोशी, अर्जुन म्हात्रे, बबन भोईर, आत्माराम म्हात्रे, सचिन म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, अरूण पाटील, जे के वायले, बाळकृष्ण घरत, सुरेश म्हस्कर, अभिमन्यू म्हात्रे, मोहन शिंदे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी अध्यक्ष ह.भ.प. मोहन म्हात्रे यांच्या हस्ते गणेश पूजन पार पडले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन सोहळा पार पडला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना ह.भ.प. धनाजी महाराज म्हणाले की, रायगड ठाणे नवी मुंबई वारकरी संप्रदायच्या माध्यमातून ४ फेब्रुवारी २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयेाजन करण्यात आले आहे. बलिप्रतिपदा पाडव्याच्या मुहूर्तावर आज मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. श्री संतशिरोमणी निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरा करीत आहे. माघ शुध्द प्रतिपदा हा श्री संतशिरोमणी निवृत्तीनाथ महाराज यांचा ७५० वा जन्म दिवस आपण साजरा करीत आहेात. या निमित्त त्या दिवशी सकाळी संत निवृत्तीनाथ महाराजांचे अनुयायी हभप संजयनाना धोंडगे यांचे किर्तन होणार आहे. ” न भूतो न भविष्यती ” असा हा कार्यक्रम होणार आहे. देव, शास्त्र, संत यांना पकडूनच हे काम करायचे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महान विभूती यांचे दर्शन होणार आहे. या भागात पुण्याची गणना होणार आहे. सगळयांच्या मनात आनंद निर्माण करणारा हा सोहळा होणार आहे. त्यामुळे हा माझा सप्ताह आहे असे ह्दयात ठेवूनच सर्वांनी काम करायचे आहे असे आवाहन हभप धनाजी महाराज यांनी केले.
१९ नेाव्हेंबरला उसाटणे गावात सभा
राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी दिं १९ नोव्हेंबर २०२३ रोजी उसाटणे गावात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या सभेला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन हभप धनाजी महाराज यांनी केले.