भारतात पहिल्यांदाच “रंगभूमी ऑलिम्पियाड”चे आयोजन
नवी दिल्ली (विजय सातोकर) – भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे भारतात पहिल्यांदाच “रंगभूमी ऑलिम्पियाड”चे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात येत्या १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या “रंगभूमी ऑलिम्पियाड”चे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार असून ते ५१ दिवस चालणार आहे. देशातील १७ शहरात एकाच वेळी रंगणाऱ्या या “रंगभूमी ऑलिम्पियाड”चा समारोप एप्रिलमध्ये मुंबईत “गेट वे ऑफ इंडिया”जवळ होईल, अशी माहिती राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक डॉ.वामन केंद्रे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री डॉ.महेश शर्मा यावेळी उपस्थित होते.
जागतिक स्तरावर आठव्यांदा होणाऱ्या या ऑलिम्पियाडमध्ये जगभरातील तीस देशांतून जवळपास पंचवीस हजार कलाकार सहभागी होणार असून ते तीस विविध भाषांतून ४५० प्रयोग, ६०० “अँबियन्स परफॉर्मन्सेस” आणि २५० “युथ फोरम” असे नाट्यविषयीचे विविध प्रकार सादर करणार आहेत, अशी माहितीही डॉ.केंद्रे यांनी दिली. भारतात होण्याऱ्या ओलीम्पियाडची थिम “मैत्रीचा ध्वज” आहे, असेही डॉ.केंद्रे यांनी सांगितले.
या “रंगभूमी ऑलिम्पियाड”चा भागम्हणून दिल्ली आणि मुंबईसह बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, जयपूर, कोलकाता, वाराणसी या शहरांमध्ये सहा राष्ट्रीय चर्चासत्रे होतील अशी माहिती डॉ.केंद्रे यांनी दिली. त्यामध्ये सतीश अळेकर, रतन थियाम, अलेक पदमसी, रुद्रप्रसाद सेनगुप्ता, एम के रैना, राज बिसरीया, बन्सी कौल. प्रोफ. त्रिपुरारी शर्मा, माया राव ,भानू भारती, नीलम मानसिंग चौधरी, प्रसन्ना, सूर्य मोहन कुलश्रेष्ठ, उषा गांगुली, बी.जयश्री आणि मनोज मित्रा आदी भारतीय रंगभूमीवर गाजलेले कलाकारांचा सहभाग असेल असेही डॉ.केंद्रे यांनी सांगितले.
सुमारे २५०० वर्षापेक्षा अधिक काळाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या आपळ्या भारतीय रंगभूमीचा आपल्याला अभिमान आहे, असे सांगून डॉ.केंद्रे म्हणाले की, अशा “ऑलिम्पियाड”च्या आयोजनामुळे आपल्याला रंगभूमीच्या माध्यमातून जगातील वेगवेगळ्या संस्कृतींशी देवाण-घेवाण करण्याची सुवर्णसंधी मिळेल. त्यामुळे भारतातील रंगभूमी रसिकांना ही एक पर्वणी ठरणार आहे, असेही डॉ.केंद्रे म्हणाले.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.अर्जुनदेव चरण यावेळी म्हणाले की, रंगभूमी हे विविध संस्कृतींना एका छत्राखाली आणणारे एक प्रभावी माध्यम असून जगातील देशाच्या सीमा एकत्र आणून एक वैश्विक गांव बनविण्याचे आमचे स्वप्न आहे.
सन १९९३ मध्ये ग्रीसमध्ये “जागतिक रंगमंच ऑलिम्पियाड”चा प्रारंभ झाला. त्यानंतर जपान, रशिया, तुर्कस्तान, दक्षिण कोरिया, चीन, पोलंड आदी देशांमध्ये “जागतिक रंगमंच ऑलिम्पियाड”चे आयोजन करण्यात आले होते.