राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, सदाभाऊंची नवीन संघटना
तर राज ठाकरेंचे फटकारे आता फेसबूकवर
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतःची वेगळी चूल थाटून ‘रयत क्रांती संघटने’ची केलेली घोषणा आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रासाठी तयार केलेले फेसबूक पेज या तीन वेगवेगळया घटना राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
कुडाळ येथील पत्रकार परिषदेत राणे यांनी आमदारकिचा राजीनामा आणि काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत असल्याची घोषणा केली. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात राणे यांनी काँग्रेसवर प्रहार केला, “काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची आश्वासनं दिली मात्र कधीच पाळली नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही,” . “तीन वेळा म्हणाले मुख्यमंत्री करतो, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही. 48 आमदारांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा सांगूनही माझं नाव घोषित केलं नाही. प्रणव मुखर्जी, दिग्विजय सिंह विमानातून दिल्लीला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर केलं,” असं राणे यांनी सांगितलं. “मी आमदारकी मागितली नव्हती. राहुल गांधी यांनी मला आमदार केलं. मला आमदार करु नये यासाठी अशोक चव्हाण दिल्लीत बसून होते,” असा आरोप नारायण राणेंनी यावेळी केला. राजकारणात येऊन मला 50 वर्ष झाली आहेत. आता महाराष्ट्र दौरा करणार आहे. नागपूर, औरंगाबाद, नांदेडला जाणार आहे,” “आज पक्ष सोडला आहे. पुढचा निर्णय नवरात्र संपण्याच्या आत घेऊ. असं राणेंनी सांगितलं.
सदाभाऊंची रयत क्रांती संघटना
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यांनतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन घटस्थापनेच्या मुहूर्तावर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘रयत क्रांती संघटने’ची घोषणा केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेले महिना-दीड महिना त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरवला.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 353 तालुक्यात संघटनेचा विस्तार करण्यात येणार असून येत्या 6 महिन्यात प्रत्येक तालुक्यात 5 हजार कार्येकर्ते तयार करा असं आवाहन त्यांनी केलंय. यावर्षी ऊस आंदोलन करावं लागणार नाही असं सांगत सदाभाऊंनी उसाचा दर मी दसऱ्याला जाहीर करणार आहे आणि तोच दर तोच अंतिम राहिल अस स्पष्ट केलं. तसंच कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला. आपण स्वतः यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
दाऊदचे केंद्राबरोबर सेटलमेंट : राजचा आरोप
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे, मात्र मोदी सरकार आपण त्याला पकडून आणल्याचं सांगत श्रेय लाटणार असल्याचा सनसनाटी आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी केला. ‘दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. हा विनोद नाही. दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन मातृभूमीत अंतिम श्वास घ्यायचा आहे. त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे’ असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या फेसबूक पेजच लाँचिंग रविंद्र नाट्यमंदिरात पार पडल. त्यावेळी राज यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. व्यंगचित्र, कामं, मतं, धोरणं आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.