डोंबिवली : सालाबादप्रमाणे यंदाही कल्याणात संत राममारूती महाराजांच्या समाधी मंदिरात श्रीराम जन्मोत्सवासह आई जानकीदेवींचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या संख्येने जमलेल्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अतिशय श्रध्दा, प्रेम आणि भक्तिभावाने संपन्न झाला. महापूजा, भजन, कीर्तन, पाठ पठण, आदी धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे परिसराला भक्ती आणि शक्तीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
संत राममारूती संस्थानतर्फे आयोजित श्रीरामनवमी आणि जानकी आई पुण्यतिथी उत्सवास मंगळवारी चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी महाराजांच्या पंचामृत महापूजेने प्रारंभ झाला. यावेळी श्रीसप्तशती पाठाचे पठण करण्यात आले. संध्याकाळी आनंदी महिला भजनी मंडळाने विविध तेरा चालींवर आधारित श्रीरामनामाचा जप सुमधुर तालस्वरात सादर केला होता. भजनी मंडळींनी केलेल्या नामजपाने परिसर दुमदुमून संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
रामनवमीदिनी सकाळी प्रभू रामचंद्रांसह संत राममारूती महाराजांची पंचामृत महापूजा झाल्यावर जानकी आईंची पंचामृत महापूजा झाली. त्यानंतर श्रीराममारुती महात्म्य, मानस पूजा, बायजी बावन्नी, पाऊलाष्टकाचे सामुदायिक वाचन झाले. जानकीआईंच्या प्रतिमेवर कुंकूमार्चन करण्यात आले. तर विणाताई लवाटे यांनी रामजन्म व जानकीआईंच्या पुण्यस्मरणावर सादर केलेल्या कीर्तनाने उपस्थित साऱ्यांना मंत्रमुग्ध केले होते. ज्ञानेश्वरी भजन मंडळासह श्रीराममारूती भजन मंडळाच्या सुश्राव्य भजनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संस्थानतर्फे उत्तम व्यवस्था केली होती.