मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अयोध्देतील राममंदिरावरून भाजपवर निशाणा साधला. प्रत्येकवेळी राम लल्लाच्या नावाने मते मागतात. जणू काय राममंदिराची मालकी यांच्याकडेच आहे. रामलल्ला कोणाची खासगी संपत्ती नसून देशाची अस्मिता आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन होताच अयोध्येत जाऊन १ कोटी रूपयांची देणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे. त्यामुळे रामलल्ला हे कोणाच्या मालकीचे नाही. अयोद्धेचा सातबारा रामाच्या नावावर आहे, भाजपच्या नावावर नाही, असे सांगतानाच भारतीय जनता पक्षाने फेरफार करुन आपले नाव टाकले आहे का ?, असा सवालही त्यांनी केला.
भाजप हवेतील पक्ष
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून अनेक प्रमुख नेते शिवसेना आणि महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा जिंकेल, असा दावा शिवसेना नेते (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने ४५ जागा जिंकण्याची भाषा जरी केली असली तरी तो हवेतील पक्ष असून दोन पक्षांच्या कुबड्यांवर उभा असल्याचा खरमरीत टोला लगावला.
देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात महायुतीला १९ ते २१ जागा तर महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही जी तयारी केली आहे, पाहता ती किमान ३५ ते ४० जागा लोकसभेच्या जिंकू, एवढ्या जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे. सर्व्हेवर कोणीही काही बोलू द्या, पण आम्ही सर्व्हे करत नाही. आमचे ४० प्लस हे मिशन नसून आत्मविश्वास आहे, असे राऊत यांनी सांगत भाजपच्या ४५ जागा जिंकण्याच्या मिशनवर हल्लाबोल चढवला.
वंचितचा निर्णय २८ डिसेंबरनंतर
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते लवकरच एकत्र बसणार आहोत. काँग्रेसचा स्थापना दिवस असल्याने २८ डिसेंबरपर्यंत काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्याबाबत २८ डिसेंबरनंतर निर्णायक बैठक होईल. या बैठकीत शंभरटक्के निर्णय होईल, असा दावा राऊत यांनी केला. प्रकाश आंबेडकर हुकूमशाहीचे हात बळकट होतील, असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. आंबेडकर आणि आमची चर्चा सुरु आहे. त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत कोणताच फरक नाही, असे राऊत यांनी सांगितले. तसेच देशात संविधान टिकावे, देशातील लोकशाहीची हत्या होऊ नये, कायदा पायदळी तुडवला जाऊ नये, मोदींची हुकूमशाही संपवावी आणि लोकशाही मार्गाने संपवावी असे मानणारे आंबेडकर असल्याचे राऊत म्हणाले.