रामदास आठवले यांचा संघर्षनायक किताबाने होणार गौरव
30 ऑक्टोबर रोजी शिवजीमंदिर दादर मध्ये रंगणार सोहळा
मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा आंबेडकरी जनतेतर्फे “संघर्षनायक” या किताबाने गौरव करण्यात येणार आहे.येत्या सोमवार दि 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मुंबईतील दादर येथील श्री शिवाजी मंदिर सभागृहात हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे . साप्ताहिक स्टार महाराष्ट्र च्या वतीने यावेळी समाजातील विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2017 या पुरस्काराने सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक सौ श्रुती मनीष पाटील आणि साप्ताहिक स्टार महाराष्ट्र चे संपादक हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.
यंदाचा स्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2017 च्या मानकरी श्रीमती गीता कपूर तसेच मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी, सुपर स्टार मानसी नाईक तसेच पद्मश्री कल्पना सरोज, आमदार नीलम गोऱ्हे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लोकशाहीर प्रभाकर पोखरिकर यांसह अन्य मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .
या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्राचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर सामाजिक न्याय राज्यमंत्री .राजकुमार बडोले तसेच जय महाराष्ट्र चॅनल चे संपादक तुळशीदास भोईटे, आयबीएन लोकमत चॅनल चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, दैनिक पुढारी चे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, दै सम्राट चे संपादक बबन कांबळे, दै. लोकनायक चे संपादक कुंदन गोटे, रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, काकासाहेब खांबाळकर आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यावेळी गौरव महाराष्ट्राचा हा मराठी वाद्यवृंद शंकर पिसाळ यांचे कलाकार सादर करणार आहेत .
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कर्तृत्वावर आधारित संघर्षनायक हे पत्रकार हेमंत रणपिसे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हेमंत रणपिसे , रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.