लखनौ – रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे.त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. जर मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईन असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते लखनौ च्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज लखनौ येथे रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली.

देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना १५ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली असुन त्या मागणीचा पुनरुच्चर आज लखनौ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केला. उत्तर प्रदेश सन २०२२ च्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजप सोबत युती करेल अशी घोषणा आठवले यांनी केली. जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेस मध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेस चे काही भले होणार नाही असा टोला आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला.

लखनौ येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास रामदास आठवले यांनी संबोधित केले. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच या वेळी विधान सभा निहाय पक्ष प्रभारींची नियुक्ती आठवले यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा विजयी लहरू द्या असे आवाहन आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता, जवाहर; अशोक पांडेय; हेंसू राम, श्याम सुंदर सिंह, जितेंद्र जैसवाल, हेमंत सिंह, जय कुमार पांडे, बलविर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!