रिंगण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा उत्स्फूर्त सहभाग

कल्याण : ठाणे – रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संत महात्मे यांच्या उपस्थितीतीत सोहळयाचे उद्घाटन पार पडले. कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या अशा या हरिनाम किर्तन महोत्सवाचा प्रारंभ झाला. या सोहळ्यानिमित्त साधू, कीर्तनकार आणि हजारो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसूनप आला.

ठाणे – रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित या राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात मोठ्या उत्साहात झाली. सकाळपासूनच राज्यभरातील वारकऱ्यांची पाऊले मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील उसाटणेजवळ वळत होती. सकाळपासूनच तरूण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहानग्या वारकऱ्यांनीही पारंपरिक वेशभुषेत कार्यक्रमस्थळी जमत होते. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंडीला सुरूवात झाली. या दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई, श्री नवनाथ, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या वेशभूषा करून आलेले वैष्णव बांधव उपस्थित होते. तर स्थानिक ग्रामस्थही पारंपरिक वेश परिधान करून टाळ मृदंग, ढोल ताशा, लेझीम पथकासह सहभागी झाले होते. याच दिंडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. टाळ आणि हरिनामाचा गजर करत त्यांनीही दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी हरिनाम सप्ताहाचे स्वागतोत्सुक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही दिंडीत सहभाग घेतला.

रिंगण सोहळयावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी …

या हरिनाम सप्ताहातील उद्घाटन समारंभात मुख्य आकर्षण ठरला तो भव्य असा रिंगण सोहळा. अक्षरशः पंढरपूरप्रमाणे साजऱ्या झालेल्या या रिंगण सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाती टाळ घेत भान हरपून सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून रिंगण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या रिंगण सोहळ्यात भागवत धर्माची पताका घेऊन रिंगण सोहळ्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वापुढे धावण्याचा मान मिळाला. हे दोघेही नेते आपापली राजकारणाची झालर बाजूला ठेवून एखाद्या सामान्य वारकऱ्याप्रमाणे या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते.

या राज्यस्तरीय हरिनाम सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, विश्वनाथ वारींगे महाराज, चेतन महाराज, दिगंबर शिवनारायण जी, विष्णूदादा मंगरुळकर, संतोष चांगो देशेकर, गोपाळ जी, शंकर गायकर, दिनेश देशमुख यांच्यासह अनेक साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महोत्सवात ज्येष्ठ व्यक्तींच्या सोबत इथला तरुण वर्गही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला होता. यातून एक आत्मविश्वास मिळतोय की धर्माचा झेंडा आणि आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे काम आपली ही नविन पिढी सक्षमपणे करत असल्याची भावना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!