डोंबिवलीच्या शहरप्रमुखपदी सभागृहनेता राजेश मोरे यांची नियुक्ती
डोंबिवली : डोंबिवली शिवसेनेत खांदेपालट झाली असून अनेक वर्षानंतर डोंबिवली पश्चिमेच्या वाटयाला शहरप्रमुखपद मिळाले आहे. केडीएमसीतील ज्येष्ठ नगरसेवक व सभागृहनेते राजेश मोरे यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हासंपर्क प्रमुख एकनाथ शिंदे आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नियुक्ती केली आहे. राजेश मोरे हे शिवसेनेचे नेते पुंडलिक म्हात्रे यांचे खंदे समर्थक ओळखले जातात.
गेल्या चार वर्षापासून शहरप्रमुखपदाची धुरा भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे होती. भाऊसाहेब चौधरी यांनी परिवहन सभापतीपदाचा त्यांचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर शहरप्रमुख पदाचा देखील राजीनामा दिला होता. डोंबिवली सारख्या सुशिक्षित सांस्कृतिक , आगरी बहुल ,ब्राह्मणी वर्चस्व व मराठा समाज असलेल्या शहरात नेमका कसा शहर प्रमुख नेमायचा याबाबत चर्चा सुरू होती. अखेर पक्षश्रेष्ठींकडून राजेश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलय. मोरे यांच्या नियुक्तीचे शिवसैनिकांकडून स्वागत होत आहे.