काँग्रेसचे नेते व माजी मंत्री राजेंद्र गावित भाजपत दाखल : शिवसेनेने विश्वासघात केल्याचा मुख्यमंत्रयाचा आरोप !
मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी आज पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात वणगा कुटूंबियांना शिवसेनेने प्रवेश देऊन विश्वासघात केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
भाजपा मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गावित यांना भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून यावा तीच त्यांना श्रध्दांजली ठरेल या मानसिकतेने कार्यकत्यांनी तयारी केलीय. पालघर लोकसभेची जागा भाजपने जिंकलीय ती भाजपकडेच राहिली पाहिजे हा निर्णय घेतलाय. ज्या चिंतामण वणगांनी भाजपला उभं केल त्यांच्या निधनानंतर भाजप निवडून येणार नसेल तर वणगा आम्हाला कधीच माफ करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. वणगा कुटूंबियांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा हा प्रकार दुदैवी आहे असे मत मुख्यमंत्रयानी व्यक्त केलं. शिवसेना अस वागायला नको होती. भाजप वणगा कुटूंबियांना उमेदवारी देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते मात्र वणगा कुटूंबयांना प्रवेश देऊन त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ नये अशा पध्दतीने शिवसेना वागली हे दुर्देवी आहे अशी नाराजी मुख्यमंत्रयानी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, गावित हे पालघरचे आमदार व राज्यमंत्री होते पालघरच्या निर्मितीत त्यांचा वाटा आहे. गावित हे राजकीय नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे लोकांच्या समस्या सोडविणे अशी सकारात्मक प्रतिमा आहे असेही त्यांनी सांगितले. भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गावित यांना भाजपमध्ये प्रवेश दिला असून पालघर लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची शिफारस संसदीय कमिटीकडे करण्यात आलीय. गावित हे १० मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.