मुंबई : दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते. पण ज्या लक्ष्मी मातेची आपण पूजा करतो. त्या लक्ष्मी मातेचे चित्र साकारले तरी कोणी, हे आपणाला माहित आहे का ? चित्रकार राजा रवी वर्मा यांनीच पहिल्यांदा लक्ष्मी मातेचे चित्र साकारले. आणि आज आपण घराघरात देवी लक्ष्मी मातेच्या प्रतिमेची पूजा करतो.
आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रवि वर्मा यांचे नाव घेतले जाते. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत.
राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने लक्ष्मी, सरस्वती, कृष्ण, शिव-पार्वती, दत्तात्रेय, रामपंचायतन इ. पौराणिक देवदेवता तसेच कृष्णशिष्टाई, विश्वामित्र-मेनका, शकुंतला-पत्रलेखन, हरिश्चं द्र-तारामती, नल-दमयंती, रावण-जटायू, मोहिनी-रुक्मांगद, श्रीकृष्ण-बलराम यांसारख्या रामायण, महाभारतादी महाकाव्यांच्या कथानकांतील पौराणिक व्यक्त्ती व घटना यांवर आधारित असत. रविवर्मा यांच्या कलेला जशी राजदरबारी प्रतिष्ठा मिळाली तसाच जनसामान्यांकडूनही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
कोण आहेत राजा रवी वर्मा …
चित्रकार राजा रवी वर्मा यांनी हिंदुच्या अनेक देवी देवतांचे चित्र काढल्याचे इतिहासाचे जाणकार सांगतात. भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची अनेक रंगीत चित्र काढली. मानवी रूपात लक्ष्मी मातेचे चित्र काढणारे राजा वर्मा हेच पहिले चित्रकार होते. राजा रवी वर्मा यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येथील किलिमनूर राजवाडयात एका राजघराण्यात झाला. त्यांचे वडील मोठे विद्वान तर आई कवयित्री हेाती. रवी वर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. त्यांच्याकडूनच चित्रकलेचा वारसा रवी वर्मा यांच्याकडे आला. याशिवाय तिरूवनंतपुरमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या चित्रकारितेला अधिकच प्रेरणा मिळाली. ते त्रावणकेारचे राजचित्रकार बनले. त्यांनी १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. राजा रवी वर्माच्या चित्रकारीता पाहून बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यभिषेकाचे चित्र काढण्यासाठी त्यांनी १८८२ साली राजा रवी वर्मा यांना बडोद्याला आमंत्रित केले ते अजूनही त्यांया दरबारत असल्याचे सांगितले आहे.