मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे आणि बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, अन्यथा रूळ उखडून टाका !
राज ठाकरेंचा मोदी- फडणवीस सरकारवर हल्ला
वसई : बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातील जमिनी बळकावण्याचा डाव सुरू आहे. मुंबई बडोदा एक्सप्रसे वे आणि बुलेट ट्रेनला जमिनी देऊ नका. आणि तरीही सरकारने जबरदस्ती केली तर रूळ उखडून टाका, असा इशारावजा आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी वसईच्या जाहिर सभेत केले, गुजरातला मुंबई ताब्यात घ्यायची आहे हा त्यांचा लाँग टर्म प्रोग्राम आहे बळी पडायचे आहे का ? त्यामुळे बेसावध राहू नका असेही राज यांनी सांगितले.
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी आपल्या दौ-याची सुरूवात पालघरपासून सुरू केली.वसईतील चिमाजी अप्पा मैदानावर झालेल्या जाहिर सभेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जहरी शब्दात टीका केली. सर्व जातींना समाजाला एकत्र घेऊन छत्रपतींनी मुघलांशी सामना केला. पण आम्ही जातीपातीत अडकून पडलोय. शिवाजी नावाचा विचार औरंगजेब मारू शकला नाही, मात्र महाराष्ट्रात शिवरायांचा विचार मारण्याचा डाव सुरू असल्याचे राज म्हणाले.
माणूसघाणा प्रंतप्रधान देशाच्या इतिहासात पाहिला नाही
मी जे मोदी पाहिले होते, ते मोदी हे नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पूर्णपणे बदलले आहेत. इतका माणूसघाणा पंतप्रधान भारताच्या इतिहासात झाला नाही अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी मोदींवर केली. कुणाशी बोलायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही, मनात आलं आणि केली नोटाबंदी, असा सगळा कारभार सुरू आहे, अशा शब्दांत राज यांनी तोफ डागली. पंतप्रधानांनी लंडनमध्ये जाऊन आपल्या डॉक्टरांची इज्जत चव्हाट्यावर मांडतात. उठसूठ परदेशात जायचंय तर इकडेयेता तरी कशाला. तिकडेच राहा ना, असा टोलाही राज यांनी मोदींवर लगावला. भाजप कॅशलेस, डिजीटल इंडियाचा नारा देतं. मग, भाजपकडे निवडणूक लढवायला कॅश येते कुठून ? असाही राज यांनी उपस्थित केला. – नरेंद्र मोदी म्हणाले आख्ख्या देशात आम्ही वीज पोचवली, मग २०१४ च्या आधी आम्ही काय अंधारात होतो का? काय खोटं बोलता? यावरून राज यांनी मोदींची खिल्ली उडवली.
फडणवीस मोदी-शहांच्या हातातलं बाहुलं
राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली. फडणवीस हे मोदी आणि शहांच्या हातातलं बाहुल असल्याची टीका करीत रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांची उपमा दिली. महाराष्ट्रात ४ लाख शौचालयं बांधली. १ लाख २० हजार विहिरी बांधल्याचे फुटकळ दावे मुख्यमंत्री करीत आहेत. महाराष्ट्रात पाणी नाही तरी पण असले दावे मुख्यमंत्री करत आहेत असे राज म्हणाले.