राज्य सरकारला खड्डे मुक्त महाराष्ट्र करता येत नाही ;
राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
डोंबिवली (प्रतिनिधी) : राज्यात सव्वा लाख विहिरी बांधल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. कदाचित त्यांनी महाराष्ट्रातील खड्डे मोजले असतील. त्यांना खड्डे मुक्त महाराष्ट्र करता येत नाही अशी खरमरीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांवर केली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले याची यादीही राज ठाकरे यांनी सभेत वाचून दाखवली.
डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मंदार हळबे आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघा चे उमेदवार प्रमोद (राजू )पाटील यांच्या प्रचारार्थ डोंबिवली पूर्वेतील डी एन सी मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याला 72 वर्षे होऊनही चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम आरोग्य याच प्रश्नावर आजही निवडणुका लढविल्या जात आहेत. याला काय म्हणावं. तुम्हाला ही परिस्थिती आवडत असेल तर मग कशाला निवडणुका घ्यायच्या ? मग असेच जगा. तुम्ही थंड आहात, म्हणूनच शहर बकाल होत आहेत असा घणाघात यावेळी ठाकरे यांनी केला.