आता टाळी गालावर : राज ठाकरेंचा इशारा
मुंबई : मनसेतून सहा नगरसेवक शिवसेनेने गळाला लावल्यानंतर मनसे व शिवसेनेतील वाद चांगलाच पेटलाय. शिवसेनेने मदत मागितली असती तर नक्की केली असती यापुढं आता थेट गालावर टाळी असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
शिवसेनेने नीच राजकारण केलयं. फोडाफोडीचे राजकारण बाळासाहेबांनी कधीच शिकवलं नाही. या नीच राजकारणाला कंटाळूनच मी बाहेर पडलो असेही राज म्हणाले. नगरसेवक फोडण्यासाठी पाच-पाच कोटी रुपये दिले, असं बोललं जातंय. सहा जण खरेदी करण्यासाठी 30 कोटी रुपये कुठून आले, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. ही लोकं मीच पाठवली आहेत, अशा सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. पाठवायचेच असते तर मी सात पाठवले असते. एकाला तरी कशाला ठेवलं असतं, असलं दळभद्री राजकारण मला करता येत नाही आणि कधी करणारही नाही. हे मी कधीच विसरू शकणार नाही असेही राज म्हणाले. हे नगरसेवक शिवसेनेत जाणार याची दीड महिन्यांपासूनच कुणकुण होती पण ज्यांनी स्वत:ला बाजारात विकायला ठेवलंच आहे त्यांना ठेवून तरी काय करणार असंही राज म्हणाले.