राज्यात जातीय तणाव चिंताजनक, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे : शरद पवार
राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची प्रकट मुलाखत
पुणे : राज्यात जातीय तणाव वाढतेाय, एकमेकांबद्दलचा द्वेष वाढतेाय. हे चिंताजनक आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून जात धर्मातील कटूता बाजूला करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. आजची मुलाखत ही ऐतिहासीक ठरली.
जागतिक मराठी अकादमीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन ‘शोध मराठी मनाचा’ या मालिकेअंतर्गत करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली. पवारांनीही सडेतोड आणि दिलखुलास उत्तरे दिली. पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर ही अनोखी मुलाखत पार पडली. ही महामुलाखत ऐकण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. मराठीचे कडवट संस्कार करा म्हणजे जातीय तणाव कमी होतील. असा सल्ला पवारांनी यावेळी दिला. त्याचबरोबर छत्रपती शिवराय हे कोणत्याही एका जातीचे नसल्याचंही ते म्हणाले.मी कृषीमंत्री असताना कॅबिनेटमध्ये सांगितलं धाडस करु,कर्जमाफी देऊ, 71 हजार कोटी कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आम्ही काही ठोस पावलं उचलली, त्यामुळे पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं. यापुढे जातीयदृष्ट्या आरक्षण देऊ नये, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. राजकीय अपयश वगैरे फार मानत नाही. ते येत जात असतं. मला राज ठाकरेंमागे राज्यातली सर्वात जास्त तरुण पिढी उभी राहताना दिसतंय असेही पवार म्हणाले. आरोपांविषयी बोलताना ते म्हणाले की, आरोपांना मी महत्व देत नाही. दाऊद इब्राहिम आणि माझी दोस्ती असल्याचा आरोप अनेकवेळा झाला. मात्र त्याचा काहीही संबंध नाही. राम नाईकांनी प्रश्न विचारला दाऊदचा भाऊ म्हणतो शरद पवार यांना ओळखतो.. याची चौकशी करावी. या आरोपाबाबत आज एकही माणूस उभा राहिला नाही .. आरोप होतात.अस्वस्थ वाटत. पण तथ्य नसेल तर दुर्लक्ष करावे असेही पवार म्हणाले.
काँग्रेसला अच्छे दिन
जुनी काँग्रेस आणि आजची काँग्रेस यात फरक. आज काँग्रेसच्या तरुणांमध्ये नवीन शिकण्याची देशात जाण्याची जाणकारांशी बोलायची तयारी दिसत आहे. ज्यातलं आपल्याला समजत नाही. ते समजून घेण्याची राहुल गांधींची तयारी आहे, हे चांगलं लक्षण आहे. त्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतील. राष्ट्रीय पातळीवर भाजप पुढं काँग्रेस हाच पर्याय आहे असेही पवार म्हणाले. आजवर माझयावर अनेक आरोप झाले पण मी आरोपांना फार महत्त्व देत नाही. आरोपांमध्ये यत्किंचितही तथ्य नसेल तर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असे पवार म्हणाले.
मोदींचा गुरू, यात कसलाही अर्थ नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार हे माझे गुरू आहेत. मी त्यांचंच बोट धरून राजकारणात आलो असे विधान केले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यामध्ये कसलाही अर्थ नसून, त्यांच्याशी माझा व्यक्तिगत सलोखा आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना दिल्लीला बैठकीला यायचे. दिल्लीत आले की, माझ्या घरी यायचे. माझी करंगळी त्यांच्या हातात कधीही सापडली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड कष्टाची तयारी असते. त्याचा त्यांना गुजरातमध्ये फायदा झाला. पण, एखादं राज्य चालवणं आणि देश चालवणं यात फरक आहे. देश चालवायचा असेल, तर तुम्हाला टिम लागते. त्या टिमच्या माध्यमातून देश चालतो. मात्र आज टिम दिसत नाही. असेही पवार म्हणाले.
बाळासाहेबांची आठवण ..
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ”सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळची गोष्ट सांगितली. बाळासाहेब म्हणाले होते की तुम्ही कमळीची काळजी करू नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरोखरच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध निवडून आली, हा किस्सा त्यांनी सांगितला. बाळासाहेब मला बारामतीचा म्हमद्या…कुठलं तरी भरलेलं पोतं अशा उपमा द्यायचे. पण त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधी सोडला नाही,” असे गौरवोद्गार शरद पवार यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काढले. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने अस्वस्थ झालो असेही पवार म्हणाले.
मुंबईला कोणीही तोडू शकत नाही
बुलेट ट्रेनच्या प्रश्नावर बोलतान पवार यांनी बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईची गर्दी वाढणार आहे. इथून अहमदाबादमध्ये कोणी जाणार नाही, पण तिथूनच लोक मुंबईत येतील. बुलेट ट्रेनच्या माध्यमातूनच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, असंही पवार म्हणाले आहेत.
विदर्भासाठी लोकमत घ्यावं
स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नाविषयी बोलताना पवार म्हणाले की, सामान्य मराठी माणूस वेगळ्या विदर्भाचा पुरस्कर्ता नाही. विदर्भासाठी लोकमत घ्यावं म्हणजे स्पष्ट होईल.. पण ते लोकमत कोणी घेतलं नाही.
——————–
राज कि उध्दव ? काय म्हणाले शरद पवार
रॅपिड फायर : यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी
– एका वाक्यात उत्तर देता येणार नाही… एकाचं कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं… तर दुसऱ्याचं आंतरराष्ट्रीय जाण पण कार्य देश आणि महाराष्ट्र पातळीवर
रॅपिड फायर : शेतकरी की उद्योगपती?
– देश शेतकऱ्यांचा जास्त त्यामुळे ‘शेतकरी’
रॅपिड फायर : अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती
– उद्योगपती हशा
रॅपिड फायर : दिल्ली की महाराष्ट्र ?
– दिल्लीच… महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा असेल तर दिल्ली हातात असायला पाहिजे
रॅपिड फायर : भाजप की काँग्रेस?
– केव्हाही काँग्रेस
रॅपिड फायर : राज की उद्धव?
– ठाकरे कुटुंबीय